Latest

रोबो शिक्षिका करीत आहे अध्यापनाचे कार्य

Arun Patil

नवी दिल्‍ली : जपानसारख्या देशात रोबोंचा वापर अनेक प्रकारे केला जातो. मात्र, आपल्या देशात रोबोंचा अद्याप फारसा वापर होत नाही. अशा स्थितीत एखाद्या शाळेत चक्‍क रोबो शिक्षिका मुलांना धडे देत असताना पाहिल्यावर आपल्याला नक्‍कीच आश्‍चर्य वाटू शकते. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एक शिक्षक दिनेश पटेल यांनी हा स्त्री रूपातील रोबो विकसित केला आहे. हा रोबो 47 भाषांमध्ये अध्यापन करू शकतो हे विशेष! याबाबत आयआयटी पवई (मुंबई)नेही त्यांचे कौतुक केले आहे.

जौनपूर जिल्ह्यातील रजमलपूर गावातील निवासी केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक दिनेश यांनी हा मानवाकृती रोबो तयार केला आहे. या रोबोला त्यांनी 'शालू' असे नाव दिले आहे. हा रोबो नऊ भारतीय आणि 38 परदेशी भाषा बोलू शकतो. रोबोमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. आता या रोबोने केंद्रीय विद्यालय पवईमध्ये अध्यापन सुरू केले आहे. या रोबो शिक्षिका सहावीपासून अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्सचे धडे देतात.

आतापर्यंत या रोबोने दहा ते अकरा वर्ग घेतले आहेत. या रोबोची निर्मिती कोरोना काळाच्या आधी करण्यात आली होती; पण त्याचे अध्यापनाचे काम आता सुरू झाले आहे. या रोबोला इंग्रजी, जर्मन, जपानी, स्पॅनिश, इटालियन, अरेबिक, चिनीसह 38 परदेशी भाषा आणि हिंदी, भोजपुरी, मराठी, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलगू, मल्याळम, उर्दू व नेपाळी या भाषाही बोलता येतात.

दिनेश यांनी सांगितले की दिवस-रात्र मेहनत करून त्यांनी सोफिया रोबोसारखा हा मानवाकृती रोबो विकसित केला आहे. विशेष म्हणजे त्याची निर्मिती प्लास्टिक, लाकूड व अ‍ॅल्युमिनियमच्या वस्तूंनी केली आहे. हा रोबो बनवण्यासाठी तीन वर्षे लागली व 50 हजार रुपयांचा खर्च आला.

SCROLL FOR NEXT