Latest

रोबो करीत आहेत शेतीची कामं!

Arun Patil

लंडन : शेतीच्या कामासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. मात्र, युरोपमध्ये सध्या त्याचीच उणीव भासत आहे. शेतीकामासाठी माणसं मिळत नसल्याने आता तेथील संपन्न शेतकर्‍यांनी चक्क रोबोंकडून शेतीची कामं करवून घेण्यास सुरुवात केली आहे. हे रोबो विविध प्रकारची शेतीची कामे करण्यात कुशल आहेत.

इंग्लंडच्या श्रॉपशायरमधील शेतांमध्ये असे रोबो दिसून येऊ शकतात. हे रोबो पेरणी, रोपलावणी, पिकांची देखभाल करणे आदी अनेक प्रकारची कामे करतात. त्यासाठी ते सौरऊर्जेचा वापर करतात. स्वयंचलित असणारे हे रोबो एखादे बी कुठे पेरले गेले आहे याचे जीपीएस सिग्नलद्वारे रेकॉर्ड ठेवतात.

श्रॉपशायरमधील अ‍ॅश्ले स्विंडेल यांनी सांगितले की हे सर्व काही असे आहे जे यापूर्वी आपण कधीही पाहिलेले नव्हते. या रोबोंना 'ड्रॉईड' असे म्हटले जाते. हे 'ड्रॉईड' म्हणजे एक चमत्कारच आहे असेही त्यांनी सांगितले. हे रोबो नांगरणी, खुरपणीसारखीही कामे करतात.

श्रॉपशायरमध्ये निळ्या फुलांच्या नीलांबरी, कांदा (स्प्रिंग ओनियन) यासारख्या पिकांसाठी या रोबोंचा वापर केला जातो. सध्या हरेक क्षेत्रामध्ये रोबोंचा वापर सुरू आहे. अगदी सीमेवरील सैन्यापासून ते ऑपरेशन थिएटरपर्यंत, स्वयंपाक घरापासून ते मालाचा पुरवठा करण्यापर्यंत अनेक कामांसाठी रोबो वापरले जात आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रासाठीही भविष्यात प्रगत रोबोंची निर्मिती होणे व त्यांचा वेगवेगळ्या कामांसाठी वापर होणे हे आता अपेक्षितच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT