Latest

रेशनवर मिळणार ‘फोर्टिफाईड तांदूळ’

Arun Patil

कोल्हापूर, अनिल देशमुख : रेशनवरून पोषणतत्त्व गुणसंवर्धित तांदूळ (फोर्टिफाईड तांदूळ) देण्यात येणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 17 जिल्ह्यांतील रेशनकार्डधारकांना त्याचे वितरण केले जाईल. एप्रिल 2023 पासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांत त्याचे रेशन दुकानांतून वितरण केले जाणार आहे.

राज्यात सध्या शेतकर्‍यांकडून हमीभावाने भात खरेदी करून त्याच्या भरडईतून तयार होणारा तांदूळ रेशन दुकानांतून वितरित केला जातो. सर्वसाधारणपणे हा कच्चा तांदूळ असतो. आता या तांदळात फोर्टिफाईड तांदूळ एकत्र करून दिला जाणार आहे.

फोर्टिफिकेशनच्या या प्रक्रियेत नियमित 1:100 या प्रमाणात कच्च्या तांदळात फोर्टिफाईड तांदूळ मिश्रित केला जाणार आहे. त्याद्वारे आर्यन, फॉलिक अ‍ॅसिड आणि जीवनसत्त्व बी-12 या तीन सूक्ष्म पोषणतत्त्वांद्वारे हा तांदूळ गुणसंवर्धित केला जाणार आहे. नियमित तांदळापेक्षा या गुणसंवर्धित तांदळाच्या नियमित सेवनाचे फायदे रेशन कार्डधारकांना सांगितले जाणार आहेत. रेशनवरून देण्यात येणार्‍या या तांदळाच्या गुणवत्तेची चाचणीही घेतली जाणार आहे. त्याकरिता अन्न व औषध प्रशासनाला सूचना दिल्या असून, त्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळाही निश्चित केल्या आहेत. गुणवत्ता तपासणीनंतर त्याबाबतचे प्रमाणपत्रही घ्यावे लागणार आहे. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

…तर सर्वच जिल्ह्यांत मार्च 2023 पूर्वीच वाटप

पहिल्या टप्प्यात राज्यातील 17 जिल्ह्यांत फोर्टिफाईड तांदळाचे वितरण केले जाणार आहे. मात्र, यावर्षीच्या (2022-23) खरीप हंगामात खरेदी होणार्‍या भाताच्या भरडईतून तयार होणार्‍या तांदळाच्या फोर्टिफिकेशनची प्रक्रिया सुरू झाली तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांत मार्च 2023 पूर्वीच त्याचे वाटप केले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT