Latest

रेशन दुकाने बनणार मिनी पेट्रोल पंप…!

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  रेशन दुकाने आता फक्त धान्य विक्री केंद्रे न राहाता ते आता मिनी पेट्रोल पंप बनणार आहेत. कारण आता एलडीओ अर्थात लाईट डिझेल विक्री रेशन दुकानातून होणार आहे. हे एलओडी सध्या पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या डिझेलप्रमाणेच काम करणार असून त्या तुलनेत हे खूपच स्वस्त असणार आहे.

हे एलडीओ ट्रक, ट्रॅक्टर, जीप, जेसीबी, जनरेटरसाठी वापरले जावू शकते. यामुळे प्रदूषणही कमी होते. तसेच डिझेलपेक्षा याची किमंती कमी असल्याने हे फायदेशीर आहे. पारंपारिक डिजेलप्रमाणेच या एलओडची क्रय शक्ती आहे त्यामुळे पारंपारिक इंधनाचे स्रोत वाचविण्यासाठीही याची मदत होणार आहे.

एलडीओ हे शासन मान्यता प्राप्त असून ते जीवनावश्यक वस्तू कायद्यांअर्तगत येते. त्यामुळे त्याची विक्री आणि वाहतूक करण्यासाठी जिल्हा अन्न धान्य नागरी पुरवठा विभाग आणि पोलिस प्रशासनाची परवानगी आहे. त्यामुळे यामध्ये कोणत्या ही प्रकारचा धोका अथवा जोखीम नसल्याचे स्पष्ट आहे. प्रत्यक्षात हे बायोडिझेल नसून एलडीओ हे पुरवठा विभागाकडून मान्यताप्राप्त असल्याकारणाने ह्याबाबत शंका घेण्याबाबत काहीच नाही असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. याच्या विक्रीला जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाचे छजउ (एनओसी)कंपनीकडून देत असल्याचे पुरवठा करणार्‍या कंपनीने कळवले आहे.

सोलापुरातील बरेच रेशन दुकानदार हे एलडीओ विक्रीकरीता इच्छुक आहेत. याचे प्रात्यक्षिक रविवारी उत्तर तहसील कार्यालया शेजारील मार्गावर दाखविण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी, कंपनीचे अधिकारी तसेच रेशन दुकानदार संघटनेचे अधिकारी उपस्थित होते, अशी राष्ट्रीय सं. सचिव व जिल्हा संपर्कप्रमुख नितीन अ. पेंटर दिली. सुनील पेंटर, अनिल जमदाडे, राज कमटम, सादिक शेख, बसवराज बिराजदार, तसेच निकीता बायोगॅसचे संदीप जैन उपस्थित होते. यावेळी सर्वांसमोर ट्रॅक्टरमध्ये हे एलडीओ टाकून त्याची क्रयशक्ती तपासण्यात आली.

काय आहे एलडीओ..?

हलके डिझेल तेल, किंवा एलडीओ हे कच्च्या तेलाच्या ऊर्ध्वपातन प्रक्रियेतील घटकांचे मिश्रण आहे. हे 750 पेक्षा कमी आरपीएम असलेल्या इंजिनमध्ये वापरले जाते. जसे की बॉयलर आणि भट्टी. एलडीओला डिस्टिल्ड इंधन किंवा चिन्हांकित तेल म्हणूनदेखील ओळखले जाते.

SCROLL FOR NEXT