Latest

रीट चा फायदेशीर पर्याय

Arun Patil

आजघडीला घराच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता खरेदी आता आटोक्यात राहिलेली नाही. यावरही एक उपाय आहे. आपण खूपच कमी किमतीत मालमत्तेत गुंतवणूक करून चांगला फायदा मिळू शकता. होय, रीट च्या माध्यमातून हे शक्य आहे. 'रीट'अंतर्गत एसआयपी सुरू करत मालमत्तेत गुंतणवूक करू शकता आणि चांगला लाभ मिळवू शकता. यासंदर्भातील माहिती जाणून घेऊ.

रिअल इस्टेट मालमत्तेत गुंतवणूक करण्यास सर्वच जण उत्सुक असतात. परंतु पारंपरिक माध्यमातून गुंतवणुकीचा विचार केल्यास ही बाब कठीण वाटते. एक तर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज भासतेे. त्याचबरोबर बिल्डर, जमीनदाराशी बर्‍याच वाटाघाटी कराव्या लागतात आणि कागदपत्री कार्यवाहीदेखील करणे तितकेच गरजेचे असते.

पण दुसरीकडे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास वैविध्यपणा कमी राहतो. कारण त्याचे मूल्य अधिक असते आणि गुंतवणुकीत लिक्विडीटी कमी असते. त्यामुळे मालमत्ता विक्री करणे सोपे राहत नाही आणि त्याची तुकड्यात विभागणी करणेदेखील शक्य राहत नाही. पण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक सोपा मार्ग आहे.

आरईआयटी म्हणजेच 'रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट', ज्याला आपण सोप्या भाषेत 'रीट' असे म्हणतो. हा एक रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे माध्यम आहे. कोरोना संसर्ग शेवटच्या टप्प्यात असल्याचे वाटत असेल आणि अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे वातावरण निर्माण झाले असेल तर रीटच्या माध्यमातून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर राहू शकते.

रीट म्हणजे काय?

आरईआयटी म्हणजेच रीट अर्थात रिअल इस्टेट प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचे एक माध्यम आहे. हे बर्‍याचअंशी म्युच्युअल फंडप्रमाणेच काम करते. ज्याप्रमाणे म्युच्युअल फंड हे विविध गुंतवणूकदारांकडून पैसा गोळा करून शेअर बाजार, बाँडस किंवा गोल्ड आदीमध्ये गुंतवणूक करते, त्याचप्रमाणे 'रीट'अंतर्गत गुंतवणूकदारांचा पैसा रिअल इस्टेट मालमत्तेत गुंतवला जातो.

म्हणेजच गुंतवणूकदार मालमत्तेचे मालक न होताच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा लाभ उचलू शकतात. भारतात 'रीट'ची संकल्पना आता कोठे रुजली आहे. परंतु अन्य देशांत त्याचा इतिहास खूपच जुना आहे. पहिल्यांदा 1960 मध्ये अमेरिकेत त्याचा प्रारंभ झाला होता.

तसेच विकसित देशात 'रीट' हा एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे. अर्थात भारतात ही संकल्पना येण्यासाठी 60 वर्षे लागली आणि आता हे सुरुवातीच्या टप्प्यातच आहे. 'रीट'नुसार रिअल इस्टेट प्रॉपटीमध्ये म्हणजे निवासी, व्यावसायिक, औद्यागिक आणि हॉटेल आदींमध्ये गुंतवणूक केली जाते. भाड्याच्या रूपातून आणि भांडवलात ज्या रितीने वाढ होते, त्यानुसार गुंतवणुकीची विभागणी केली जाते.

गुंतवणुकीचे माध्यम

'रीट'मध्ये गुंतवणुकीचे दोन माध्यम आहेत. बहुतांश रीट हे स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड असतात. त्यामुळे गुंतवणूकदार जसे इक्विटी शेअरची खरेदी करतात, त्याचप्रमाणे रीटचे शेअरदेखील खरेदी करता येऊ शकतात. भारतात सध्या तीन लिस्टेट रीट आहेत. दुसरी पद्धत म्हणजे गुंतवणूकदार 'फंड अँड फंड ऑफ फंड स्कीम'च्या माध्यमातून रीटमध्ये गुंतवणूक करू शकतात.

फंड ऑफ फंड याचा अर्थ म्युच्युअल फंड स्कीमच्या अशा योजना की, त्या दुसर्‍या स्कीमच्या युनिटमध्ये गुंतवणूक करतात. भारतात सध्या कोटक इंटरनॅशनल रीट फंड ऑफ फंड आहे. याचे संचलन जपान येथील सुमितोमो मितुशी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी करते. दुसरी फंड ऑफ फंड स्कीम ही महिंद्रा मॅन्यूलाइफ अ‍ॅशिया पॅसेफिक आरईआयटीच्या युनिटमध्ये गुंतवणूक करते.

या फंडची गुंतवणूक सिंगापूर, हाँगकाँग, ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या देशात आहेत. तसेच सुमारे 45 मोठ्या आणि डायव्हर्सिफाइड रीट हे यांच्या पोर्टफोलिओत आहेत. गुंतवणूकदार हे अन्य म्युच्युअल फंड योजनेप्रमाणेच आरईआयटी फंड ऑफ फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. आरईआयटी फंड ऑफ फंडमध्ये एकरकमीप्रमाणेच एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे शक्य आहे. एसआयपीच्या माध्यमातून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक होत असल्याने खूपच किरकोळ रक्कमेने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतो.

गुंतवणुकीमागचे कारण

रिअल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्टला गुंतवणूकदारांचा पैसा अशा मालमत्तेत गुंतवावा लागतो की, तो सहजपणे भाड्याने किंवा करारावर देण्यासारखा असतो. अशा माध्यमातून होणार्‍या उत्पन्नातून किमान 90 टक्के भाग हा गुंतवणूकदारांना लाभांशाच्या रूपाने द्यावा लागतो. कारण बहुतांश रीट हे स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड असते आणि त्यामुळे यात लिक्विडीटीची समस्या राहत नाही. त्याचबरोबर गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय रीटमध्ये देखील गुंतवणूक करतात आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर वाढल्यास रिटर्नवर सकारात्मक परिणाम पडतो.

'रीट'ला फंड मॅनेजर हे सक्रिय रूपाने मॅनेज करतात आणि जर एखाद्या मालमत्तेतून कमी लाभ मिळत असेल, तर त्यास विक्री करून चांगल्या मालमत्तेत गुंतवणूक केली जाते. एक रीट फंड ऑफ फंडवर मिळणार्‍या निव्वळ भांडवली नफ्यावरील कराचा विचार केल्यास तीन वर्षांपेक्षा अधिक काळात गुंतवणूक करत राहिल्यानंतर आपण युनिटची विक्री केली तर त्यावर इंडेक्सेशनचा लाभ मिळेल आणि 20 टक्के दराने लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल.

साधारणपणे वीस टक्के दराने लाँग टर्म कॅपिटेल गेन हे गुंतवणूकदारांच्या उत्पन्नाला जोडले जाते आणि त्यावर गुंतवणुकीच्या एकूण उत्पन्नानुसार कर भरावा लागतो. गुंतवणूकदार आपल्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये वैविध्यपणा आणण्याच्या उद्देशातून रीट फंड ऑफ फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT