Latest

रायगड : सततच्या वणव्यामुळे वनसंपदा होतेय नष्ट

दिनेश चोरगे

खाडीपट्टा; रघुनाथ भागवत :  महाड खाडीपट्ट्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वणव्याने वनसंपदा अडचणीत येत असून वणव्यामुळे निर्माण होणाऱ्या धुराचा त्रास या परिसरातून म्हाप्रळ-महाड रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांनाही होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील खाडीपट्ट्यातील रस्त्याच्या लगत मोठ्या प्रमाणात वनसंपदेला वनव्याने घेरले असल्यामुळे काळ्या धुरामुळे वाहनचालकांच्या डोळ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

येथील तेलंगे, चिंभावे, गोंमेंडी, वराठी, बेबलघर, वलंग, सोनघर, रोहन, जुई येथील डोंगर माथ्यासह राष्ट्रीय महामार्गालगतच्या वाळलेल्या गवताला मोठ्या प्रमाणात वणव्याने गेली कित्येक दिवस घेरले आहे. आगीच्या भक्षस्थानी गेलेल्या गवताने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.

येथील ग्रामीण दूर्गम भागातील डोंगर भागासह माळरानावर लागलेल्या नव्याने शेतकऱ्यांनी दुबार शेतीतील अपयशामुळे आंबा, काजूच्या लागवडीला मोठा धक्का पोहोचत आहे, एकीकडे शासन वृक्ष लागवडीकडे मोठ्या प्रमाणात सक्रिय भर देत आहे, तर दरवर्षी लागणाऱ्या वणव्याने वृक्षांची अतोनात कत्तल होत असताना, वन्यजीवांनाही आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. त्यामुळे वन्यप्राणी गाव वस्तीकडे येत असल्याचे पहायला मिळत आहे. तसेच वनसंपदा नष्ट होत असल्याने कमालीची उकड्यामध्ये वाढ झाल्याचे देखील जाणवत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी घटून पाणीटंचाईची समस्या देखील मोठ्या प्रमाणात भासण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रखरखत्या उन्हामध्ये दुपारी लागणाऱ्या वणव्याने रस्त्यावरून वाहने हाकणे मोठे जिकरीचे होऊन बसले असून गुरुवारी रोहण फाट्यालगत रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वणव्यामुळे नाहक त्रास वाहनचालकांना होत असून नष्ट होत चाललेल्या वनसंपदेला वणवा विरोधी मोहीम अधिक गतिमान करणे गरजेचे आहे असे मत येथील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

कारवाईची मागणी

सतत लागणाऱ्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात वन संपदा नष्ट होऊ लागली आहे, त्यामुळे वणवा विरोधी मोहीम अधिक गतिमान करून संबंधित अधिकाऱ्यांनी वणवा लावणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. खाडीपट्ट्यातून जाणाऱ्या राष्टीय महामार्गालगत असणाऱ्या भागात सर्वत्र डोंगरभाग वणव्याने व्याप्त झाला असून त्यामुळे तेथील माकडासारखे प्राणी गाव वस्त्यांमध्ये वास्तव्याला आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT