Latest

शिवसेना नेते रामदास कदम यांना ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत धक्‍का

Arun Patil

दापोली ; पुढारी वृत्तसेवा : मंडणगड, दापोली नगरपंचायत निवडणुकांच्या ऐन रणधुमाळीत शिवसेना नेते रामदास कदम यांना जबर धक्‍का बसला आहे. त्यांच्या मर्जीतील पदाधिकार्‍यांची उचलबांगडी करून त्या जागी नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचे शिवसेनेतीलच कट्टर विरोधक माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या समर्थकांची वर्णी या नव्या नियुक्त्यांमध्ये लावण्यात आली आहे.

पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्यासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिप प्रकरण रामदास कदम यांना भोवले असून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या साह्याने अ‍ॅड. परब यांनी विरोधात मोर्चा उघडून कदम यांचे पंख छाटण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विरोधी पक्षनेते ते विविध मंत्रिपदे अशी रामदास कदम यांची मोठी राजकीय कारकीर्द आहे. 1990 पासून रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे कधी एकमेकांशी पटलेले नाही. कदम यांनी नेहमीच सूर्यकांत दळवी यांच्यावर मात करून राजकारणात मंत्रिपदापर्यंत सरशी केली.

रामदास कदम यांनी पुत्र योगेश कदम यांना दापोलीच्या राजकारणात सक्रिय केले. युती काळात कदम यांनी मोठ्या प्रमाणात दापोली मतदारसंघात निधी आणला. मात्र, राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर शिवसेनेेने नव्या नेतृत्वाला संधी देताना आघाडी सरकारमधून रामदास कदम यांना बाहेर ठेवले.

आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजपचे किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. त्यात दापोलीतील मुरुड येथील रिसॉर्ट प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणात पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्याबाबत रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना माहिती पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर कथित ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाल्या. यानंतर येथील शिवसेनेच्या नियुक्त्यांमध्ये अ‍ॅड. परब यांनी लक्ष घातले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर दापोलीच्या राजकारणाला खर्‍या अर्थाने कलाटणी मिळाली. होऊ घातलेल्या दापोली आणि मंडणगड या नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी गेली काही वर्षे आमदारकी गेल्यानंतरही शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार्‍या सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आली. मागील दोन दिवस पालकमंत्री अ‍ॅड. परब हे रत्नागिरी दौर्‍यावर असून दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ त्यांनी फोडला.

याच वेळी त्यांनी दापोली मतदार संघातील कार्यकारिणीची फेररचना करताना नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये माजी आमदार दळवी यांचेे हात बळकट करताना त्यांच्या कार्यकर्त्यांना झुकते माप दिले. दळवी यांचे कट्टर समर्थक किशोर देसाई यांना विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी बढती देण्यात आली आहे.

नवीन पदाधिकार्‍यांची वर्णी

शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नव्याने नियुक्‍ती करण्यात आल्या आहेत. राजू निगुडकर-उपजिल्हाप्रमुख- उत्तर रत्नागिरी जिल्हा, किशोर देसाई-विधानसभा क्षेत्रप्रमुख-दापोली विधानसभा, ऋषिकेश गुजर- तालुकाप्रमुख- दापोली, संतोष गोवळे – तालुकाप्रमुख-मंडणगड, संदीप चव्हाण- शहरप्रमुख-दापोली शहर, विक्रांत गवळी- उपशहरप्रमुख-दापोली शहर अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT