Latest

राज्यातील नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर

Shambhuraj Pachindre

कोणत्याही क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवणे आणि तो टिकवून ठेवणे एरव्ही अभिमानास्पद मानले जाते. औद्योगिकीकरण, उत्पन्न, कृषी, सांस्कृतिक चळवळी अशा बाबतीत आपले पुढारलेपण महाराष्ट्राने मोठ्या अभिमानाने मिरवले आहे; मात्र एका विषयाबाबतचा पहिला क्रमांक महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारा असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अहवालावरून स्पष्ट होत आहे. हा विषय आहे नद्यांच्या प्रदूषणाचा!

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत प्रदूषणाचे किमान निकष ओलांडलेल्या नद्यांमधील 311 पट्ट्यांनी मान्य निकषांची किमान पातळी ओलांडली असून त्यात महाराष्ट्रातील 55 पट्ट्यांचा समावेश आहे. इतर सर्व राज्यांना मागे टाकून प्रदूषणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळविला. तपासणीत पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण किती आहे, त्यावर त्या पाण्याचा स्तर ठरवला जातो आणि त्याला बायॉलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) असे म्हटले जाते. बीओडी जितका कमी तितके पाणी शुद्ध आणि जितका अधिक तितके पाणी प्रदूषित मानले जाते. एका लिटर पाण्याचा बीओडी 30 मिलिग्रॅम किंवा अधिक असेल, तर प्राधान्यक्रम एक, तो 20 ते 30 असेल, तर प्राधान्यक्रम दोन, तो 10 ते 20 असेल, तर प्राधान्यक्रम तीन, तो 6 ते 10 असेल, तर प्राधान्यक्रम चार आणि 3 ते 6 च्या दरम्यान असेल, तर प्राधान्यक्रम पाच असतो. बीओडी -3 च्या आत असेल, तर ते पाणी शुद्ध समजले जाते. देशातल्या 603 नद्यांच्या पाहणीत 279 नद्यांतील 311 पट्टे प्रदूषणाची किमान पातळीही ओलांडली असल्याचे म्हणजे तीनपेक्षा अधिक बीओडी असल्याचे आढळून आले. या 311 पट्ट्यांपैकी सर्वाधिक 55 पट्टे हे महाराष्ट्रात असून मध्य प्रदेश दुसर्‍या क्रमांकावर (19), बिहार तिसर्‍या क्रमांकावर (18), केरळ तिसर्‍या क्रमांकावर (18), कर्नाटक चौथ्या क्रमांकावर (17), उत्तर प्रदेश पाचव्या क्रमांकावर (17), राजस्थान सहाव्या क्रमांकावर (14), तर गुजरात सातव्या क्रमांकावर (13) आहे.

महाराष्ट्रातील नद्यांच्या या प्रदूषणाची प्राधान्यक्रमांच्या गटानुसारची विभागणीही चिंताजनक आहे. प्राधान्यक्रम एकमध्ये म्हणजे अतिप्रदूषित गटात महाराष्ट्रातील चार पट्टे आहेत. प्राधान्यक्रम 2 ते 5 मधील पट्ट्यांची अनुक्रमे संख्या 5, 18, 17 आणि 11 अशी आहे. महाराष्ट्रातील कोणकोणत्या नद्या प्रदूषित आहेत हे पाहिले, तर नेमक्या कोणत्या भागांत प्रदूषण आहे, हे लक्षात येईल. 2019 आणि 2021 या वर्षांत महाराष्ट्रातील 56 नद्यांच्या 156 ठिकाणांची पाहणी केली असता त्यातील 55 नद्यांवरील 147 ठिकाणे प्रदूषित असल्याचे दिसून आले. या नद्यांत अंबा, अमरावती, भातसा (शहापूर ते भिवंडीपर्यंतचा पट्टा),भीमा (पुणे ते सोलापूरपर्यंतचा पट्टा), बिंदुसरा, बोरी, चंद्रभागा (गुरसाळेजवळचा पट्टा), दारणा, घोड (शिरूरजवळचा पट्टा), गिरणा, गोदावरी, गोमती, हिवरा, इंद्रायणी (मोशी गाव ते आळंदी गावापर्यंतचा पट्टा), काळू (कल्याणजवळचा पट्टा), कान, कन्हान, कोलार, कोयना (कर्‍हाडजवळचा पट्टा), कृष्णा (महाबळेश्वर आणि सातार्‍याजवळचा पट्टा), कुंडलिका (रोह्याजवळचा पट्टा), मांजरा, मिठी (माहीमजवळचा पट्टा), मोर, मोरणा, मुचकुंदी, मुळा (आळंदी गाव ते बोपोडीपर्यंतचा पट्टा), मुळा-मुठा (मुंढवा ते थेऊरपर्यंतचा पट्टा), मुठा (पुणे शहरातून जाणारा पट्टा), नीरा (सारोळा तेसांगवीपर्यंतचा पट्टा), पांझरा, पाताळगंगा (खोपोली ते खरपाडापर्यंतचा पट्टा), पवना (सांगवी गाव ते दापोडीपर्यंतचा पट्टा), पेढी, पेनगंगा, पूर्णा, रंगावली (नवापूरपर्यंतचा पट्टा), सावित्री (महाडजवळचा पट्टा), सीना (मोहोळजवळचा पट्टा), सुर्‍या, तानसा, तापी, तितूर, उल्हास (बदलापुरते मोहानेपर्यंतचा पट्टा), उरमोडी, वैतरणा, वासिष्ठी (चिपळूणजवळचा पट्टा), वेळ (शिक्रापूरजवळचा पट्टा), वेण्णा (महाबळेश्वर ते माहुलीपर्यंतचा पट्टा), वाघूर, वैनगंगा, वर्धा, वेना आदींचा समावेश होतो. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा महाराष्ट्राच्या सर्वच भागांतील नद्यांची नावे यात असली, तरी त्यांचे बारकाईने विश्लेषण केले असता एक बाब स्पष्ट होते. सर्वाधिक प्रदूषित नद्या या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांजवळच्या आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे आणि तो म्हणजे या नद्यांच्या प्रदूषणाला सर्वाधिक कारणीभूत आहेत ती शहरे. शहरांमधील सांडपाणी, मैला पाण्यावर प्रक्रिया करण्याची संबंधित महापालिकांची यंत्रणा कुचकामी आहे.

– सुनील माळी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT