Latest

राज्यात ‘मास्कसक्ती’ कायम : राजेश टोपे

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : चीनमध्ये अनेक शहरांत सध्या लॉकडाऊन आहे. इतर काही देशांत असलेली कोरोनाची चौथी लाट पाहता आपल्याकडे चौथ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध एक एप्रिलपासून पूर्णपणे हटविण्यात येत असले, तरी सध्या तरी मास्कमुक्तीचा विचार करता येणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टोपे यांनी बुधवारी दुपारी मुंबईत फेसबुकवरून संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यासह देशात कोरोनाचे सावट कमी झाले आहे. आपल्याकडे चांगले लसीकरण झाल्याने तिसर्‍या लाटेचा प्रभाव जाणवला नाही; पण कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. चीनसह युरोपातील काही देशांत अद्यापही कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. कोरोना विषाणू आपले स्वरूप (म्युटेट व्हेरियंट) केव्हाही बदलू शकतो. त्यामुळे यंत्रणांना कायम खबरदारी घ्यावी लागते.

आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातो तेव्हा स्वत:च्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्याही सुरक्षेसाठी मास्क आवश्यक आहे. मास्कमुक्तीचा निर्णय आता तरी घेता येणार नाही. मात्र, ज्यावेळी धोका पूर्णपणे संपेल तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सणांवर बंदी नाही

गुढीपाडवा सणावर सरकारने कोणतेही बंधन घातलेले नाही. रामनवमी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीदेखील साजरी करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याबाबत तेच निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कस्तुरबात प्रथमच रुग्ण शून्यावर

कोरोना आल्यापासून कोविड समर्पित रुग्णालय म्हणून कस्तुरबा रुग्णालय ओळखले जाते. मुंबईतील रुग्णसंख्या घटत असतानाही या रुग्णालयात एकही रुग्ण दाखल नसल्याची नोंद आजवर कधी झाली नव्हती. मंगळवारी मात्र, कस्तुरबात कोरोनाचा एकही रुग्ण दाखल झाला नाही, असे अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी सांगितले.

विमानतळावरही शून्य रुग्ण

जानेवारी महिन्यात देशांतर्गत प्रवास करणारे सहा विमान प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु मार्च महिन्यात ही संख्या शून्यावर आली आहे. मुंबई विमानतळावर जानेवारीत 909 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. हे प्रमाण 2.30 टक्के होते. फेब्रुवारीत यात घट होऊन हा दर 0.30 टक्यांवर आला. तर मार्च महिन्यात 0.43 टक्के प्रवासी कोरोना ग्रस्त आढळले.

SCROLL FOR NEXT