Latest

राज्यात ज्वारीचा पेरा घटला; दर प्रतिक्विंटल ४ हजारांवर

दिनेश चोरगे

सोलापूर;  संतोष सिरसट :  राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ज्वारी पेरणी क्षेत्रात तब्बल १७ टक्क्यांनी घट झाली आहे. एकीकडे ज्वारीचा पेरा घटला असला तरी बाजारात ज्वारीचा भाव मात्र पेटला आहे. ज्वारीला प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

एकीकडे ज्वारीचे क्षेत्र घटले असताना मका, हरभरा, गहू या पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रब्बी हंगामात मक्याच्या क्षेत्रामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. त्याखालोखाल हरभरा व गव्हाच्या पेरणी क्षेत्रातही वाढ झाली आहे. ज्वारीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. ज्वारीच्या काढणीचा मोठा फटका तिचे पेरणी क्षेत्र कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. एकीकडे ज्वारीचे क्षेत्र घटत असताना तिच्या दराने नवा उच्चांक निर्माण केला आहे. सध्या बाजारात प्रतिक्विंटल चार हजार रुपये दराने तिची विक्री केली जात आहे. हा पेरणी क्षेत्र घटल्याचा परिणाम आहे. एवढेच नाही तर ज्वारीची पेरणी कमी झाल्यामुळे साहजिकच कडब्याचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे कडब्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्याचाही फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. राज्यात ज्वारीसाठी १७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे. मात्र, यंदाच्या वर्षी केवळ १३ लाख २९ हजार १२५ हेक्टर क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी झाली आहे. मागील वर्षीची तुलना केली असता हे क्षेत्र जवळपास १७ टक्क्यांनी कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्याचा परिणाम ज्वारीच्या भाववाढीवर झाला आहे.

रब्बी मकेच्या क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ जवळपास ४६ टक्के एवढी आहे. मकेचा वापर मोठ्या प्रमाणात पशुपालक करतात. राज्यात दुग्ध उत्पादनात वाढ होत असल्याने पशुपालकांना आपल्या जनावरांना घालण्यासाठी मकेच्या चाऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. त्यामुळे साहजिकच मकेच्या पेरणी क्षेत्रामध्ये जवळपास ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हिरवा चारा म्हणूनही मकेचा वापर केला जातो. एवढेच नाही तर दुभत्या गाईंसाठी मकेचा भरडा दूध उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे. बाजारातही मकेला चांगला दर मिळत आहे. सध्या प्रतिक्विंटल २२०० ते २३०० रुपये एवढा दर मकेला मिळत आहे.

SCROLL FOR NEXT