Latest

राज्यात आजपासून धावणार इलेक्ट्रिक बसेस

Arun Patil

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महापालिकांची परिवहन सेवा आणि एस.टी. महामंडळ यांच्यासाठी इलेक्ट्रिक बसेसचा शुभारंभ 1 जूनपासून होत आहे. राज्यातील 8 महापालिका आणि एस.टी. महामंडळ यांनी एक हजार इलेक्ट्रिक बसेसची मागणी नोंदविली आहे. त्यातील 20 टक्केच बसेस उपलब्ध झाल्या आहेत. पुढील 4 महिन्यांत उर्वरित बसेस उपलब्ध होतील. नगर-पुणे या मार्गावर पहिली ई-बस धावणार असून, एकूणच ई-बस सेवेचा शुभारंभ होणार आहे.

वाढत्या वाहनसंख्येमुळे जागतिक पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत आहे. त्यामुळे प्रदूषण करणार्‍या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक पावले उचलत आहेत.

राज्यातील महापालिका व एस.टी. महामंडळ परिवहन सेवेत सन 2022 च्या अखेरपर्यंत 1 हजार इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने वित्त आयोगातून तीन हजार कोटींचे अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये 1 जून रोजी इलेक्ट्रिक बस पुणे ते नगर या मार्गावर प्रथमतः सुरू होत आहे. पर्यावरण रक्षणाच्या द़ृष्टिकोनातून हे प्रथम पाऊल परिवर्तनाची नांदी ठरणार, असा विश्वास पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

केंद्राप्रमाणेच राज्यानेदेखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर दिला आहे. त्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 ची घोषणा केली आहे. 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत 10 टक्के हिस्सा इलेक्ट्रिक वाहनांचा असेल, असा विश्वास मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

जागतिकस्तरावर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत आहे. जी वाहने प्रदूषणमुक्त आहेत, अशा वाहनांना सर्वच ठिकाणी प्राधान्य देण्याचा निर्णय शासकीयस्तरावर घेण्यात आला आहे.

एस.टी.नंतर महापालिका आणणार इलेक्ट्रिक बसेस

सार्वजनिक परिवहन सेवेत इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचे धोरण शासनस्तरावर अवलंबण्यात येत आहे. 1 जूनपासून एस.टी. महामंडळात इलेक्ट्रिक बसेसचा समावेश झाल्यानंतर आगामी काळात राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या परिवहन सेवेतदेखील इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे. मुंबई महापालिकेने 300, ठाणे महापालिकेने 81, पुणे महापालिकेने 38, कल्याण-डोंबिवली पालिकेने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT