Latest

राज्यसभा निवडणूक : बहुजन आघाडी, सपाने वाढवली शिवसेनेची चिंता

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनी शिवसेनेची चिंता वाढवली आहे. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याला कोणताही पक्ष अस्पृश्य नाही. कोणाला मतदान करणार ते आपण जाहीरपणे सांगू, अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेची अडचण होऊ शकते. तसेच सपानेही पक्षश्रेष्ठींना विचारून भूमिका ठरवण्याचा निर्णय घेतला आहे तर 'एमआयएम'ने शिवसेना आणि भाजप या दोघांनाही मतदान करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. आपले आमदार फुटणार नाहीत याची काळजी घेताना सहाव्या जागेसाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना खेचण्यासाठी नेते कामाला लागले आहेत. राज्यसभा निवडणूक शुक्रवारी होणार आहे. मतदानाला आता अवघे चार दिवस राहिले आहेत. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक या दोन कोल्हापूरकरांतच होणार आहे.

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. त्यामुळे ठाकूर यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांनी आपल्याला कुणीही अस्पृश्य नाही, असे जाहीर केल्यानंतर शिवसेना खासदार राजन विचारे, आमदार सुनील राऊत यांच्या शिष्टंडळाने त्यांची भेट घेऊन मनधरणी केली; तर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेला अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांनाही आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

ब्ल्यू प्रिंट तयार : शेलार

रेल्वेमंत्री आणि निवडणूक निरीक्षक अश्विन वैष्णव यांच्या उपस्थितीत रविवारी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. कोरोनाची लागण झाल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री आणि उमेदवार पीयूष गोयल यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीनंतर आशिष शेलार यांनी आमची निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून रणनीती, कार्यपद्धतीची ब्ल्यू प्रिंट तयार आहे, असा दावा केला.

ते म्हणाले, रोज सकाळी उठून बोलणार्‍या खा. संजय राऊत यांचे बोलणे हे बालिशपणाचे आणि पोरकटपणाचे आहे. त्यांना कदाचित स्वपक्षाचा पराभव दिसत असेल. त्यामुळे ते असे बोलत आहेत.

मुख्यमंत्री घेणार आज अपक्ष आमदारांची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी अपक्ष आमदारांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. या बैठकीला किती अपक्ष येतात, याबाबत उत्सुकता आहे. राज्यसभा आणि येणार्‍या विधान परिषद निवडणुकीत अपक्षांना व्हीप लागू होत नाही. त्यामुळे त्यांच्या मतांना महत्त्व आले आहे. त्यांची काही नाराजी किंवा मागण्या असतील तर मुख्यमंत्री त्यावर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेसाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

भाजपचे आमदारही ट्रायडंटमध्ये; शिवसेना ठिकाण बदलणार

राज्यसभा निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण रंगल्याने शिवसेनेने कोणताही धोका नको म्हणून आपल्या आमदारांना दोन दिवस आधीच हॉटेल ट्रायडंटमध्ये मुक्कामी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजप आमदारही तेथेच मुक्कामी येणार असल्याचे समजल्याने शिवसेना आपला मुक्काम अन्य ठिकाणी हलविणार आहे. बहुदा हयात रिजेन्सीमध्ये शिवसेनेच्या आमदारांना हलवले जाऊ शकते.

एमआयएम, सपा मुस्लिम कार्ड खेळण्याच्या तयारीत

एमआयएम आणि सपाचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. एमआयएमने आम्ही भाजप आणि शिवसेनेला मते देणार नाही, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा खासदार ओवैसी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र या दोन्ही पक्षाला मते देण्याऐवजी एमआयएम या निवडणुकीत मुस्लिम कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे. एमआयएमचे काँग्रेसशी पटत नसले तरी ते मुस्लिम व्होट बँकेला खूश करण्यासाठी प्रतापगढी यांना पाठिंबा देऊ शकतात. तर सपा देखील मुस्लिम मतदारांना खूश करण्यासाठी असाच पवित्रा घेऊ शकते. असे झाले तर ही बाब शिवसेनेला अडचणीची ठरू शकते. अशावेळी प्रतापगढी अतिरिक्त मते मिळवून निवडून येतील. पण शिवसेनेला संजय पवार यांच्यासाठी आवश्यक मतांचा कोटा मिळविताना कसरत करावी लागणार आहे.

काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गेंवर जबाबदारी

राज्यसभेच्या निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपवली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली. राजस्थानची जबाबदारी पवन बन्सल आणि टी. एस. देव यांच्यावर सोपवली आहे. हरियाणासाठी भूपेश बघेल आणि राजीव शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT