बिकानेर : कधी कधी पशू-पक्षीही भन्नाट प्रकार करीत असतात आणि त्यामुळे माणसाच्या नाकीनऊ येत असते. राजस्थानमध्ये बिकानेर येथे तर एका वळूने कहरच केला. या वळूने पायर्यांवरून एका दोन मजली इमारतीचे छत गाठले आणि तिथेच ठिय्या मारला. अखेर क्रेनच्या सहाय्याने या वळूला तेथून खाली आणण्यात आले!
हा वळू छतावर गोंधळ माजवू लागल्यावर इमारतीच्या मालकाला आणि शेजार-पाजार्यांचे लक्ष तिकडे गेले. हे लोक छतावर गेल्यावर त्यांना पाहून वळूने आणखी दंगा सुरू केला. त्याला जिन्यावरून खाली आणण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले; पण वळूने त्यांना दाद दिली नाही! अखेर त्याला खाली आणण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. काही धाडसी लोकांनी त्याला पकडून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्याच्या पोटाला दोरखंड बांधून क्रेनच्या सहाय्याने त्याला अलगद खाली आणण्यात आले. दोन तासांच्या मेहनतीनंतर अखेर या वळूचे पाय जमिनीला लागले! तोपर्यंत हा बिनपैशाचा तमाशा पाहण्यासाठी लोकांनी मोठीच गर्दी केली होती.