Latest

राजकीय हेतूने आयकर विभागाची कारवाई : रोहित पवार

रणजित गायकवाड

बारामती : पुढारी वृत्तसेवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यासंबंधी आमदार रोहित पवार यांनी रविवारी (दि. १०) आपली भूमिका मांडली. राजकिय हेतूने कारवाई होत असेल तर ती चुकीची बाब असल्याचे आमदार पवार म्हणाले. आपल्या कुटूंबीयांना त्रास होत असेल तर ही गोष्ट कोणालाही आवडत नाही. आयकर विभाग कोणाच्याही घरी छापेमारी करू शकते. मात्र यामध्ये राजकीय हेतू नसावा, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

पवार म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आयकर विभागाची छापेमारी कोणावरही होत असते असे स्पष्ट केले आहे. मात्र कुटुंबियांना त्रास दिला जाऊ नये. करण्यात आलेली छापेमारी उगीचच त्रास देण्याच्या हेतूने नसावी अशी अपेक्षा आहे. सध्या राज्य आर्थिक संकटात आहे. केंद्राकडून अपेक्षीत निधी मिळत नसताना महाविकास आघाडी सरकार अतिवृष्टीच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अद्याप त्या भागातील पंचनामे पूर्ण होत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी कर्ज काढू पण शेतकऱयांना मदत करू, असा शब्द दिला आहे. राज्य सरकारमधील जबाबदार व्यक्ती ज्यावेळी असा शब्द देते, तेंव्हा कोणताही शेतकरी मदतीपासून वंचीत राहणार नाही, असा विश्वास मला आहे असे पवारांनी सांगितले.

आर्यन खान ड्रग्स् प्रकरणावर भाष्य करताना आमदार पवार म्हणाले, मंत्री नवाब मलिक यांनी जो मुद्दा मांडला तो आधी समजुन घेतला पाहिजे. ज्या बोटीवर शंभर दिडशे मुले-मुली होत्या, त्यातील ठराविक लोकांनाच का पकडले. इतरांना कशाच्या आधारावर सोडले. तसेच या प्रकरणी कारवाई करतान भाजपचे पदाधिकारी कसे काय उपस्थित होते, असे प्रश्न कोणाही सर्वसमान्य नागरिकाला पडणार हे साहजिकच आहे. ड्रग्स् घेणारा कोणीही असो कारवाई होत असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला हवा. कायदेशीर कारवाईत पारदर्शकता हवी. तसेच नितेश राणे यांना काय म्हणायचे आहे तेच मला कळत नाही, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

SCROLL FOR NEXT