Latest

राजकारण अन् निवडणुका दारूवर : डॉ. अभय बंग

दिनेश चोरगे

वर्धा; पुढारी वृत्तसेवा :  व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून उनाड इच्छांविरुद्ध समाजहित असा दारूचा संघर्ष आहे. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी दोन लाख कोटींची दारू फस्त केली जाते. महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र झाले आहे. दारूमुळे भारतीय स्त्रीचा वैधव्याच्या दिशेने प्रवास सुरू होतो. मात्र, राजकारण आणि निवडणुका दारूवर विसंबून असल्याने मद्य प्रश्नाच्या समस्येला बगल देण्यासाठीच दारूबंदीचा बागुलबुवा केला जात असल्याची खंत गडचिरोली येथील शोधग्रामचे प्रवर्तक 'महाराष्ट्रभूषण' डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली. दारूमुळे कित्येक वर्षे समाजहित धोक्यात आले; मात्र दारूसंदर्भात कडक शिक्षा कधी होणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याची भावना बंग यांनी मांडली.

वर्धा येथील महात्मा गांधी साहित्यनगरी परिसरात सुरू असलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी रंगलेल्या प्रकट मुलाखतीत ते आपल्या भावना व्यक्त करत होते. आचार्य विनोबा भावे सभामंडपात पार पडलेलली ही मुलाखत मुक्ता पुणतांबेकर, विनोद शिरसाठ आणि विवेक सावंत यांनी घेतली. यानिमित्ताने अनेक पैलू डॉ. बंग यांनी उलगडून सांगितले. सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास उलगडताना डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांवरही काही आक्षेप घेतले. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यावर विशेष असा प्रकाश मराठी साहित्यिकांकडून टाकण्यात आलेला नाही, असा खेद व्यक्त केला.

SCROLL FOR NEXT