Latest

रस्ते, वाहननिर्मितीत आधुनिक तंत्रज्ञानाला पर्याय नाही : नितीन गडकरी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : देशात सध्या 30 कोटी वाहने असून येणार्‍या दहा वर्षांत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. लोकसंख्या आणि वाहनांची वेगाने होणारी वाढ रोखू शकत नाही. त्यामुळे रस्ते आणि वाहन निर्मिती उद्योगात नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरल्याशिवाय पर्याय नाही, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर दौर्‍यावर असताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शनिवारी सकाळी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, दै. 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, खा. धनंजय महाडिक, सौ. गीतादेवी प्रतापसिंह जाधव, सौ. स्मितादेवी योगेश जाधव यावेळी उपस्थित होते.

मंत्री गडकरी यांनी देशात नव्याने उभारले जात असणारे रस्ते प्रकल्प, वाहन उद्योगात वापरल्या जाणार्‍या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल डॉ. जाधव यांना माहिती दिली. ते म्हणाले, कोव्हिड काळात दोन महिन्यांत नागपूरमध्ये असताना नवनवीन उपक्रम राबविले. विशाखापट्टणम येथून एअरलिफ्ट करून ऑक्सीजन मागविला. व्हेंटिलेटरची निर्मिती केली.

ई कास्टिंग नवी क्रांती

ई-कास्टिंग बांधकाम व्यवसायातील नवीन क्रांती ठरणार आहे, त्या अनुषंगाने नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आसाममधील ब्रह्मपुत्र नदीमध्ये पूल बांधणीची घोषणा केली व कमी खर्चात त्याची उभारणी केली. कारगीलमध्ये नवीन बोगदा उभारण्यात येणार आहे. हवेत उडणारी डबल डेकर बस सुरू करण्याचा मानस असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले.

ग्रीन हायड्रोजनला पर्याय नाही

नवीन आठ ट्रक एवढा जुना ट्रक प्रदूषण करतो, असे सांगून केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, ग्रीन हायड्रोजन इंधनाशिवाय येणार्‍या काळात पर्याय राहणार नाही. वाहनांचे फिटनेस सेंटर, ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर, स्क्रॅपिंग सेंटर उभारण्याची मोठी गरज भासणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून रबराची पावडर करून त्याचा उपयोग डांबरामध्ये केला जात आहे. साखर कारखान्यांसाठी वापरले जाणारे हार्वेस्टर व ट्रॅक्टरमध्ये प्लास्टिकपासून तयार केलेल्या क्रूड पेट्रोलचा उपयोग केला जाणार आहे. आगामी काळात माहितीचा स्रोत हीच खरी शक्ती असणार आहे. त्याचा उपयोग दैनंदिन गरजा भागविण्यापासून सर्वच क्षेत्रात वापरण्यावर भर दिला जाणार असल्याचे मंत्री गडकरी म्हणाले.

रस्ता खोदाईत कचरा डंप करण्याची सूचना

देशात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. अहमदाबाद महानगरपालिकेने रस्ते प्रकल्प करताना खोदलेल्या जमिनीत तेथील कचरा डंप केला आहे. त्याप्रमाणेच कोल्हापूर-रत्नागिरी रस्ते प्रकल्प करताना अहमदाबादप्रमाणे नियोजन केल्यास 20 हजार टन कचर्‍याची विल्हेवाट लावणे शक्य होईल, अशी सूचना मंत्री गडकरी यांनी केली.

SCROLL FOR NEXT