कीव्ह, वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या सैन्याने रशियाचे अनेक अंदाज चुकवले आहेत. त्यामुळेच मोठी सेना, कित्येकपटींनी जास्त असलेली ताकद आणि संसाधनानंतरही रशियाला युक्रेनकडून कडव्या प्रतिकाराचा अनुभव येत आहे. या पाठीमागे युक्रेनने गेल्या काही वर्षांत केलेली तयारी महत्त्वाची ठरल्याचे दिसत आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे युक्रेनच्या महिला सैनिक. या महिला सैनिकांनी रणभूमीत टिच्चून उभे राहत रशियाच्या तयारीला सुरुंग लावला आहे.
युक्रेनला रशियाच्या आक्रमणाचा अंदाज यापूर्वीच आला होता. त्यामुळेच गेल्या वर्षीपासून युक्रेनने युद्धाची तयारी सुरू केली होती. तर गेल्या काही महिन्यांत युक्रेनमध्ये हजारो महिलांना सैन्यात भरती करून घेतले गेले. याच महिला सैनिकांनी युद्धाचा चेहरामोहरा बदलल्याचे बोलले जात आहे. एक-दोन दिवसांत युक्रेनवर ताबा मिळवू, असे रशियाला वाटत होते. पण सहा दिवस उलटले तरी रशियाला युक्रेनवर ताबा मिळवणे शक्य झालेले नाही. याचे कारण म्हणजे युक्रेनियन सैन्य देत असलेली चिवट झुंज. याउलट रशियाचे या युद्धात बरेच नुकसान झाले आहे. रशियाला या युद्धात दररोज सव्वा लाख कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत.
रशियाने 2014 मध्ये क्रिमियावर हल्ला करून तिथे ताबा मिळवला. डोनबास आणि लुहानस्कमध्येही रशियाने फुटीरवाद्यांच्या मदतीने हल्ले सुरू केले होते. तेव्हापासूनच कधी ना कधी रशियाच्या आक्रमणाला तोंड द्यावे लागेल, याची जाणीव युक्रेनला झाली होती. त्यामुळे तेव्हापासून युक्रेनने तयारीला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या तयारीत महिला सैनिकांनाही महत्त्व देण्यात आले.
युक्रेनमध्ये चार वर्षांपासून महिलांची सैन्य भरती सुरू करण्यात आली. 20 ते 40 वयोगटातील महिलांना कॉम्बॅट ग्रुपमध्ये प्रवेश दिला जातो तर 50 वर्षांपर्यंतच्या महिलांना अधिकारी बनता येते. गेल्या वर्षभरात महिला सैनिकांच्या भरतीत वाढ झाली. 2020 पर्यंत एकूण सैन्यात महिलांचे प्रमाण 15.6 टक्के होते. पण मार्च 2021 पर्यंत हे प्रमाण 22.5 टक्के इतके झाले. म्हणजेच युक्रेनची प्रत्येक चौथी महिला सैन्यात आहे. जगातही हे प्रमाण सर्वाधिक आहे. युक्रेनच्या याच नीतीमुळे रशियाला कडवी टक्कर मिळाली आहे. रशियन सैन्यात महिलांचे प्रमाण 4.2 टक्के इतके आहे. तसेच यातील महिलांना युद्धावर पाठवले जात नाही.
पत्रकार, संगीतकारही बनले सैनिक सर्वसामान्य महिलांनाही शॉर्ट टर्म प्रशिक्षण देऊन युद्धात पाठवले जात आहे. यात पत्रकार, ग्रंथपाल, मानसशास्त्रज्ञ, संगीतकार, जनावरांचे डॉक्टर यांचा समावेश आहे. पूर्वी युक्रेनमध्ये सैन्यभरतीसाठी 18 ते 60 अशी वयोमर्यादा होती. तथापि, सर्वच वयोगटांनी भरतीसाठी पसंती दर्शवली. त्यामुळे ही वयोमर्यादा हटवण्यात आली. आणि आता बुजूर्गही हातात बंदूक घेऊन लढायला तयार झाले आहेत.