Latest

रशिया-युक्रेन युद्ध : अण्वस्त्रांच्या धमकीमुळे ‘या’ गोळ्यांची निर्माण झाली टंचाई

अमृता चौगुले

प्राग : रशिया-युक्रेनमधील युद्ध आठ दिवसांपासून अधिकाधिक भयावह होत चालले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या आदेशानंतर रशियाचे 'न्युक्लिअर डिटरेन्स फोर्स' अ‍ॅलर्ट मोडवर आहे. एखाद्या देशाने खुलेआम अण्वस्त्रांची धमकी देण्याचा प्रकार गेल्या अनेक दशकांच्या काळात घडलेला नाही. आता रशियाकडून असे घडत असल्याने जगात, विशेषतः युरोपमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रशिया-युक्रेन युद्धाची परिणती अणुयुद्धात होऊ शकत असल्याची भीती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत युरोपमध्ये आयोडिनच्या गोळ्यांना मागणी वाढली असून या गोळ्यांची टंचाई निर्माण झाली आहे!

पुतीन यांच्या धमकीमुळे विशेषतः मध्य युरोपात चिंतेची वातावरण आहे. पोलंडपासून बेलारुसपर्यंत आणि सोव्हिएत संघाचे विघटन होऊन स्वतंत्र झालेल्या देशांपर्यंत सर्वत्र या युद्धाची दहशत निर्माण झालेली आहे. अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो या भीतीने सध्या अनेक लोक आयोडिनच्या गोळ्या खरेदी करण्यासाठी धावपळ करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की अण्वस्त्रांचा हल्ला झाला तर त्याच्या रेडिएशन म्हणजेच किरणोत्सर्गापासून आयोडिन बचाव करील! त्यामुळे आयोडिनच्या पिल्सपासून ते सिरपपर्यंत अनेक वस्तूंची मागणी वाढली आहे.

मागणी इतकी आहे की युरोपातील अनेक देशांमध्ये तिची टंचाई निर्माण झाली आहे. फार्मसी युनियनचे अध्यक्ष निकोले कोस्तोव यांनी म्हटले आहे की गेल्या सहा दिवसांमध्ये बुल्गारियाच्या फार्मेसीने आयोडिनची इतकी विक्री केली आहे जितकी गेल्या वर्षभरातही झालेली नव्हती! अनेक फार्मसी तर आधीपासूनच 'आऊट ऑफ स्टॉक' आहेत! वाढत्या मागणीमुळे आम्ही नवी ऑर्डर नोंदवलेली आहे. मात्र, तो स्टॉकही लवकरच संपेल असे आम्हाला वाटते. लोक आयोडिनच्या गोळ्या साठवून ठेवत आहेत. रेडिएशनच्या धोक्याच्या काळात मानवी शरीराला थायरॉईडची समस्या आणि कर्करोगासारख्या काही आजारांपासून बचाव करण्यासाठी आयोडिन उपयुक्त ठरू शकते असे मानले जाते. 2011 मध्ये जपानी अधिकार्‍यांनी शिफारस केली होती की क्षतिग्रस्त फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाच्या आसपास राहणार्‍या लोकांनी आयोडिनच्या गोळ्या घ्याव्यात. हे सर्व लक्षात घेऊन आता युरोपात आयोडिनला मागणी वाढली आहे.

SCROLL FOR NEXT