Latest

रखडलेल्या डोसप्रश्‍नी तालुका वैद्यकीय अधिकारी रडारवर!

Arun Patil

कोल्हापूर ; विकास कांबळे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करून वर्ष झाले, तरी अद्याप शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण न झाल्याने याबाबत तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना जाब विचारण्यात येणार आहे. गेल्या महिनभरापासून पहिल्या डोसची टक्केवारी कासव गतीने वाढत असल्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात येत आहे.

कोरोना संसर्गावर प्रतिबंधक उपाययोजना राबवत असताना लसीकरण प्रभावी उपाय असल्याने जानेवारी 2021 पासून संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला लसीचे उत्पादन मर्यादित होते. त्यामुळे लसीचा तुटवडा जाणवत होता. नंतर लस उपलब्ध होईल, तसे लसीकरणासाठी नवनवीन वयोगटांचा सामवेश करण्यात येऊ लागला.

जिल्ह्यात लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांची 32 लाख 14 हजार 288 आहे. आतापर्यंत 30 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणार्‍या नागरिकांची संख्या 22 लाख झाली आहे. त्याची सरासरी 68 टक्के आहे. संथ गतीने सुरू असलेल्या लसीकरणाबाबत जिल्हा परिषद पदाधिकारी वारंवार आरोग्य विभागाला सूचना देत आहेत, तरीदेखील जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस लसीकरण मोहिमेला वर्ष झाले, तरी अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे यासंदर्भात आता तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना जाब विचारण्यात येणार आहे.

शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस अद्याप पूर्ण का होऊ शकला नाही, याची कारणे शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे. त्यामध्ये पहिला डोसही न घेतलेल्या व्यक्‍तीची माहिती घेऊन डोस न घेण्याची कारणे शोधावीत. त्यासाठी अशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांची मदत घ्यावी.

गैरसमजुतीतून एखादी व्यक्‍ती डोसच घेणार नसेल, तर त्याच्याकडून अथवा त्याच्या घरातील व्यक्‍तीकडून लेखी घ्यावे. यासंदर्भातील संपूर्ण माहिती महिनाभरात संकलीत करण्याच्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

SCROLL FOR NEXT