Latest

रंगोत्सव करा पर्यावरणपूरक!

Arun Patil

कोल्हापूर ; कृष्णात चौगले : माणसाचे आयुष्य विविध रंगांनी सजलेले आहे. त्यातील प्रत्येक रंगाचे महत्त्व वेगवेगळे असते. रंगपंचमीला (Rangpanchmi 2022) मात्र सर्वत्र रंगांचा रंगतदार सोहळाच असतो. प्रत्येकजण हा रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. आपल्या रंगांच्या या उधळणीमुळे प्राणी, पक्षी यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.

बाजारातील अनेक रंगांमध्ये केमिकल असते. विविध प्रकारच्या घातक रसायनामुळे हे रंग शरीरासाठी व आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. केमिकल असलेल्या रंगांमुळे त्वचेवर खाज, पुरळ येतात. दम्याचा आजार वाढू शकतो. हे रंग डोळ्यात गेल्यास डोळे लाल होणे, चुरचुरणे असा त्रास होऊ शकतो. त्वचेवर चट्टे येणे, केस गळणे, अशा काही समस्या निर्माण होतात. यावर उपाय म्हणजे नैसर्गिक आणि घरच्या घरी केलेले रंग वापरणे. काही ठरावीक रंग आपल्याला करता येतील.

घरच्या घरी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी काही फळांचाही वापर करता येतो.त्यात बीटचा वापर लाल रंगासाठी आणि कच्च्या हळदीच्या वापर केशरी-पिवळ्या रंगासाठी करता येतो. या दोन्हींची पेस्ट तयार करता येते. झाडांची पाने, फुले यापासून रंग तयार करता येतात.गुलाबाची फुले त्यासाठी जास्त उपयुक्त ठरू शकतात.

हे रंग दोन-तीनदा धुतल्यानंतर अंगावरून निघू शकतात. तसेच या रंगामुळे त्वचेवर किंवा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. आनंदाचा प्रत्येक क्षण साजरा करताना प्रत्येकाने निसर्गाचेही भानही ठेवले पाहिजे. तरच तो उत्सव साजरा केल्याचे समाधान आनंद देईल.

रंगपंचमी खेळा, जरा जपून (Rangpanchmi 2022)

रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव. जीवनात आनंद देणार्‍या रंगांना या दिवशी महत्त्व आहे. हा रंगांचा सण बेधुंदपणे खेळून रंगाचा बेरंग करण्यापेक्षा पाण्याचा कमी वापर करून आज (दि. 22) सुरक्षित रंगपंचमी खेळूया… पण जरा जपून, असे आवाहन विविध संस्था-संघटनांसह लोकप्रतिनिधींच्या वतीने सोशल मीडियावरून करण्यात आले आहे.

सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने शहरासह उपनगरात ठिकठिकाणी रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे दोन वर्षांनंतर यंदा जल्लोषात हा उत्सव साजरा होणार आहे. आठ दिवस आधीपासून रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या आहेत. उत्सवाच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत रंग आणि पिचकारी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केलेली दिसून आली.

अलीकडच्या काही वर्षांत उत्सवापेक्षा हा सण रंगांच्या वापरामुळे काही प्रमाणात धोकादायक बनला आहे. हे रंग आपल्या केसांना व त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. तसेच श्वसन संस्था, पचन संस्थांनाही इजा होण्याची शक्यता असते. सोनेरी, चंदेरी रासायनिक रंगामुळे कॅन्सरचाही धोका बळावतो. त्यामुळे रंगाची उधळण जपूनच केलेली बरी. कृत्रिम रंगांतील रासायनिक घटकांमुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. सद्य:स्थितीत कोरोनाचा आलेख कमी झाला असला तरी त्याचा धोका कायम असल्याने सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणार्‍या व्यक्तींनी रंगपंचमी खेळणे टाळावे.

कसे कराल घरच्या घरी नैसर्गिक रंग (Rangpanchmi 2022)

हिरवा : हळदीमध्ये नीळ मिसळल्यास हिरवा रंग तयार होतो. यासह पालक, धने, पुदीना, टोमॅटो किंवा कडुलिंबाची पाने वाटून पाण्यामध्ये मिसळल्यास हिरवा रंग तयार होतो.

लाल : कोरडा लाल रंग तयार करण्यासाठी लाल जास्वंदाच्या फुलांचा वापर करता येईल. जास्वंदाच्या फुलांची पावडर व पीठ एकत्र तयार करा. गाजराला पाण्यात उकळून लाल रंग तयार करता येतो.

पिवळा : हळद आणि बेसन एकत्र केल्यास सुकलेला पिवळा रंग तयार होतो. झेंडूची फुले पाण्यामध्ये उकळून पिवळा रंग तयार करता येतो.

नारंगी : केशर पाण्यात टाकून रात्रभर ठेवा. नारंगी रंग तयार होतो. लगेच नारंगी रंग तयार करायचा झाल्यास केशर पाण्यामध्ये टाकून उकळावे. पळसाच्या फुलांचाही वापर केल्यास नारंगी रंग तयार होतो.

निळा : कपडे धुताना वापरल्या जाणार्‍या निळीचा वापर करून निळा रंग तयार करता येतो.

तपकिरी : कॉफी पावडरचा वापर करून तपकिरी रंग तयार करता येतो. चहा पावडर पाण्यामध्ये उकळूनही रंग तयार होतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT