Latest

युद्धभूमी पर्यटनाला चालना गरजेची

निलेश पोतदार

– ब्रिगेडियर हेमंत महाजन

लडाखमध्ये पर्यटनाला सरकारने परवानगी दिल्यानंतर या भागात पर्यटक मोठ्या प्रमाणावर जाताना दिसत आहेत. ही सकारात्मक बाब आहे. लेह-लडाख-कारगिल येथील भटकंतीला आपण युद्धभूमी पर्यटन म्हणू शकतो. या पर्यटनाला अधिक चालना देण्याची गरज आहे. त्यातून प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होईल.

भारतात पर्यटनासाठीच्या प्रेक्षणीय स्थळांचा अक्षरशः खजिना आहे. यामध्ये लेह-लडाखचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. गेल्या काही आठवड्यांपासून लडाखमध्ये पर्यटनाला सरकारने परवानगी दिल्यानंतर या भागात पर्यटक मोठ्या प्रमाणावर जात आहेत. ही सकारात्मक बाब आहे. भारतीय पर्यटक लाखो रुपये खर्च करून युरोपच्या बर्फाळ भागाला भेट देतात. मात्र, त्याहून अधिक सुंदर ठिकाणे अत्यंत कमी खर्चात कारगिल आणि लेहमध्ये बघता येतात. शिवाय, या पर्यटनाला दुसरीही एक बाजू आहे. ती म्हणजे या भागाच्या अर्थकारणाची. लडाखसारख्या अति थंड, अति दुर्गम भागांमध्ये पर्यटनाशिवाय फारसे व्यवसाय उपलब्ध नाहीत. अशा वेळी पर्यटन वाढल्यास या भागांमधल्या जनतेला विविध व्यवसाय उपलब्ध होत असतात. त्यामुळे लेह, लडाख, कारगिल यांसारख्या भागांमध्ये जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट दिली पाहिजे. याचा दुसरा एक फायदा असा होईल की, त्यातून चीन आणि पाकिस्तनलासुद्धा एक महत्त्वाचा संदेश दिला जातो. कारण, आजघडीला भारत-चीन सीमेवर मोठ्या संख्येने पर्यटक येत असताना चीनच्या बाजूला चिनी सैनिकांशिवाय इतर कोणीही दिसून येत नाही. त्यामुळे सीमेवरील पर्यटनाबाबतीत चीनवर आपण नक्कीच कुरघोडी केलेली आहे.

लडाख आणि कारगिलमधल्या पर्यटनाचे अनेक पैलू आहेत. एक म्हणजे युद्धभूमी पर्यटन. यामध्ये द्रास, कारगिल जिथे कारगिलचे 1999 चे युद्ध झाले होते अशी ठिकाणे पर्यटकांना पाहता येतात. याशिवाय 1962 मध्ये चुशुलच्या भागात झालेली लढाई, तिथेसुद्धा जाता येते. 1947-48 मध्ये ज्या सैनिकांनी लडाखला पाकिस्तानमध्ये जाण्यापासून वाचवले त्यांचे युद्धस्मारक पर्यटकांना पाहता येते. चीनबरोबर गलवानमध्ये झालेली लढाई आणि दक्षिण व उत्तर भागामध्ये झालेल्या हातापाईच्या जागासुद्धा अगदी जवळून बघता येतात.

रस्त्यामुळे लडाख आणि कारगिलमध्ये आपल्याला दोन दिशांनी रस्त्याने काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या बाजूने येता येते. श्रीनगरच्या बाजूने श्रीनगर, झोजीला, द्रास, कारगिल या मार्गाने व हिमाचल प्रदेशच्या बाजूने खरदुंगला खिंड, मनाली या रस्त्यावरून येता येते. अटल बोगद्यामुळे आता मनाली रस्त्यावर पठाणकोटवरून केवळ आठ तासांमध्ये लेहमध्ये पोहोचता येते. याशिवाय विमानाद्वारे मोठ्या शहरांमधून लेह विमानतळावर दोन तासांत उतरता येते. लेह हे लडाखमधील सर्वात मोठे शहर आणि लडाखची राजधानी आहे. लडाख हे भारतातील सर्वात उंच पठार आहे आणि त्यातील बहुतेक भाग 3 हजार मीटरपेक्षा जास्त आहे. लडाख ज्याला 'लँडस् ऑफ पासेस' म्हणून ओळखले जाते. लडाखच्या मुख्य आकर्षणांपैकी एक, जगातील सर्वाधिक उंचीवरील खार्‍या पाण्याचे सरोवर पँगाँग लेक 14 हजार फुटांवर आहे. पँगाँग लेकचा 60 टक्के भाग चीनमध्ये तर 40 टक्के भाग भारतात आहे. प्रत्यक्ष सीमारेषेचा भाग या लेकमधून जातो. युद्धभूमी पर्यटनाशिवाय येथे नैसर्गिक सौंदर्य खास आहे. अनेक गुंफा, उंच शिखरे, देखणी खोरी, नदीकिनारे, वाळवंटी भाग, सपाट प्रदेश अशा अनेक भागांना भेटी देता येतात. येथे ट्रेक ट्रेल्स आणि ट्रेकिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. लडाखमध्ये ट्रेकिंगबरोबरच बाईक चालविणे, वॉटर राफ्टिंग, सफारी यांसारख्या साहसी खेळांमध्येही भाग घेऊ शकतो. अनेक प्रकारचे अ‍ॅॅडव्हेंचर टूरिझमसुद्धा करता येते. बर्फाच्छादित टेकड्यांच्या मध्यभागी लडाख हे तिबेटी बौद्ध संस्कृतीचे केंद्र आहे. लडाखमधील काही लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये नुब्रा व्हॅली सारख्या अनेक खोर्‍यांचा समावेश आहे. येथे तिबेट मृग, आयबॅक्स आणि याक यासह दुर्मीळ वन्यजीव आहेत.

लडाख प्रदेशातील कारगिल दुसर्‍या क्रमांकाचं शहर आहे. सुरू नदीच्या काठावर वसलेला हा जिल्हा, लेह श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग-1 वर महत्त्वाचे ठिकाण आहे. इथल्या स्थानिकांनी पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक कारगिलला भेट देतात. या भटकंतीदरम्यान द्रासचे वॉर मेमोरियल आवर्जून पाहावे. 1999 सालच्या कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या स्मरणार्थ सैन्याने टायगर हिलच्या पायथ्याशी हे स्मारक उभारले. द्रासच्या वॉर मेमोरियलच्या गेटवर लिहिलेल्या 'तुमच्या उद्या करता आम्ही आमचे आज दिले- भारतीय सैन्य' या ओळी वाचून सगळेच निःशब्द होतात. गेटमधून आत आल्यावर, समोरच दिसते, ती तोलोलिंग टेकडी आणि मग कारगिल युद्धाच्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. इथून तोलोलिंग, टायगर हिल, पॉईंट 4875 बात्रा टॉप युद्धभूमीचा भाग असणारी शिखरे दिसतात. युद्धात वापरलेली शस्त्रास्त्रे, कॅप्टन मनोज पांडे गॅलरी, कारगिल युद्धाची गाथा सांगणारी फिल्म पाहायला मिळते. लेहवरून कारगिलला जाताना अन्यही अनेक ठिकाणे पाहता येतात. लेहपासून 25 कि.मी.वर पत्थर साहिब गुरुद्वारा आहे. सैन्याकरता हे पूजनीय ठिकाण आहे. पुढे सिंधू आणि झस्कार नद्यांचा संगम असलेले सुंदर स्थान आहे. मॅग्नेटिक हिल हे याच रस्त्यावर आहे. या स्पॉटला गाड्या बंद केल्यावरसुद्धा चुंबकीय प्रभावामुळे चढावर चढतात. प्रत्येक जण हा प्रयोग करून पाहायला इथे थांबतो. लामायुरू गावाजवळ काही टेकड्यांवर मूनलँड सारखी जमीन पाहायला मिळते. अलची गोंपा आणि लामायुरू गोंपा हे सगळ्यात जुने गोंपासुद्धा बघण्यालायक आहेत.

लेह-लडाख-कारगिल येथील भटकंतीला ढोबळमानाने आपण युद्धभूमी पर्यटन असे म्हणू शकतो. तो आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. या स्थळांना भेटी दिल्यामुळे आपले सैनिक अशा कठीण भागामध्ये कसे लढतात याची मनोमन जाणीव होते. आपले जवान या दुर्गम भागात उपलब्ध साधनसामग्रीच्या सहाय्याने प्रतिकूल हवामानात टिकाव धरून डोळ्यांत तेल घालून सीमांचे रक्षण करतात म्हणून आपण देशाच्या सीमांमध्ये निश्चिंतपणाने वावरू शकतो, याची जाणीव या स्थळांना भेट देऊन आल्यावर होते. त्यामुळे या पर्यटनाला अधिक चालना देण्याची गरज आहे. त्यातून प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होईल. अर्थात, केवळ लेह-लडाख आणि कारगिलच नव्हे तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधल्या भारत-चीन सीमेवरतीसुद्धा अशाच प्रकारचे युद्धभूमी पर्यटन हे सुरू केले गेले पाहिजे. ज्यांना शक्य आहे अशा प्रत्येक भारतीयाने देशाच्या या सीमावर्ती भागात पर्यटन करून तिथल्या जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत केली पाहिजे. या भागाला भेटी देऊन भारतीय सैनिकांचेसुद्धा मनोबल वाढवता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT