Latest

युद्ध लादले तर जशास तसे उत्तर देऊ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा चीनला अप्रत्यक्ष इशारा

Arun Patil

इटानगर, वृत्तसंस्था : भारताला युद्ध नको आहे; मात्र युद्ध आमच्यावर लादले गेले तर आम्ही कोणत्याही आव्हानाला आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत, असा खणखणीत इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला अप्रत्यक्षपणे दिला आहे..

अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन संघर्षानंतर संरक्षण मंत्री प्रथमच अरुणाचल प्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. सियांग येथे मंगळवारी त्यांनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशने बांधलेल्या पुलाचे उद्घाटन केले.

संरक्षणमंत्री म्हणाले की, भारत कधीही युद्धाला प्रोत्साहन देत नाही. आम्हाला आमच्या शेजार्‍यांशी नेहमी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. हा वारसा आम्हाला भगवान राम आणि बुद्ध यांच्याकडून मिळाला आहे; मात्र भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहोत.

हे युद्धाचे युग नाही या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचा पुनरुच्चार करून त्यांनी सांगितले की, आम्हाला येथे कोणालाच संदेश द्यायचा नाही. एक मोठा कार्यक्रम होता म्हणूनच आम्ही आलो आहोत. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन करत असलेले काम पाहून मला आनंद झाला. डोंगराळ भागात ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या संस्थेचे काम कसे चालले आहे याबद्दल सुरुवातील मीदेखील संभ्रमात होतो. तथापि, आता जेव्हा प्रत्यक्ष काम पाहायला मिळाले तेव्हा मला सुखद धक्का बसला.

28 प्रकल्प राष्ट्राला समर्पित

देशाच्या सीमावर्ती भागातील 28 प्रकल्प राष्ट्राला समर्पित करताना मला आनंद होत आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ज्या गतीने काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे. सरकारचे प्राधान्य अधिकाधिक सीमावर्ती भागांना जोडणे आहे, जेणेकरून तेथे राहणार्‍या लोकांमध्ये आत्मविश्वाासाची भावना निर्माण होईल, असेही संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT