Latest

युक्रेन युद्धामुळे भारताचीही हानी

अमृता चौगुले

आशिया पॅसिफिक भागात युक्रेनची सर्वाधिक निर्यात भारताला होत असते. सध्या युक्रेन देश उद्ध्वस्त केला जात असून यामुळे भारतास पोहोचणारी झळ प्रचंड असणार आहे.

रशियाच्या युक्रेनवरील बेदरकार आक्रमणाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर भीषण परिणाम होणार आहे. ब्रिटन, अमेरिकेसह युरोपियन महासंघाने मोजक्या रशियन बँकांना 'स्विफ्ट' या जगातील बँकिंग संदेश सेवेमधून हाकलले आहे. भारतासह दोनशेहून जास्त देशांमध्ये अकरा हजार बँका व वित्तसंस्थांना स्विफ्टमार्फत सेवा पुरवली जाते. स्विफ्टमधून हद्दपार झालेल्या रशियाला लक्षणीय आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल. सध्या सुरू असलेल्या युद्धाचा भारतातील कमोडिटी बाजारावर परिणाम झाला आहे आणि हा चिंतेचा विषय आहे.

तेलाच्या किमती आधीच प्रतिबॅरल शंभर डॉलरवर गेल्या आहेत. मौल्यवान खडे आणि प्लॅटिनमच्या किमतीही वाढणार आहेत. युक्रेन हा कृषी उत्पादनांचा एक महत्त्वाचा निर्यातदार देश आहे; पण सध्या बॉम्ब हल्ल्यांमुळे काळ्या समुद्रामार्गे होणारा व्यापार घटला आहे. त्यामुळे गहू व मक्याचे भाव वाढणार आहेत. रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू निर्यातदार देश असून, युक्रेन याबाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. गव्हाच्या जागतिक निर्यातीत या दोन्ही देशांचा मिळून वाटा 25 टक्के आहे. तेलाच्या किमती प्रतिबॅरल दीडशे डॉलर झाल्यास जागतिक जीडीपी एक टक्क्याने कमी होईल, असा अंदाज आहे. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त तेल आयात करतो. एन 32 एअरक्राफ्ट यासारख्या संरक्षण साधनांचे प्रकल्प युक्रेनमध्ये असून आपण मोठ्या प्रमाणात हवाई सामग्री युक्रेनकडून आयात करतो. युक्रेनमधील अनेक इमारती, कारखाने, प्रकल्प उद्ध्वस्त केले जात असून, त्यामुळे या आयातीस फटका बसणार आहे. उद्या रशिया आणि 'नाटो' यांच्यातील तणाव टोकाला गेल्यास अशावेळी चीन रशियाच्या अधिक जवळ जाणार आहे. दक्षिण चीन समुद्रातून होणार्‍या व्यापारात चीन बाधा आणू शकेल. तसे झाल्यास अमेरिका, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, जपान, भारत या देशांच्या आयात-निर्यातीस तडाखा बसू शकतो.

युक्रेन या देशाचे क्षेत्र सहा लाख चौरस फूट असून, त्याची लोकसंख्या चार कोटी आहे. तरीदेखील युरोपातील छोट्या छोट्या देशांच्या तुलनेत युक्रेन हा मोठाच देश म्हणायला हवा. युक्रेनला डिसेंबर 1991 मध्ये सर्वप्रथम मान्यता देणार्‍या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. मे 1992 मध्ये भारताने कीव्हमध्ये आपली वकिलातही उघडली. त्याच्या पुढच्याच वर्षी युक्रेनने नवी दिल्लीत वकिलात स्थापन केली. आशियाई देशांतील युक्रेनची ही पहिली वकिलात होय. 2005 मध्ये राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी युक्रेनचा दौरा केला होता. 2012 मध्ये युक्रेनचे अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच हे भारताच्या दौर्‍यावर आले होते. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार असताना युक्रेनचे आर्थिक विकास व व्यापारमंत्री भारतात आले होते, तर 2016 मध्ये भारताचे अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गीते युक्रेनला गेले होते. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन परराष्ट्रमंत्री युक्रेनला जाऊन आले. विविध वस्तूंचा व्यापार, अवकाश संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण सामग्री याविषयी उभय देशांत अनेक करारमदार झाले.

गेल्या 25 वर्षांत भारत-युक्रेन व्यापार उल्लेखनीय प्रमाणात वाढून, तो तीन अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आशिया पॅसिफिक भागात युक्रेन सर्वाधिक वस्तू भारताला निर्यात करतो. संपूर्ण जगात युक्रेनच्या निर्यातीत भारताचा पाचवा क्रमांक लागतो. भारतातून युक्रेनला औषधे, कच्चे लोखंड व अन्य खनिजे, तंबाखू, चहा, कॉफी, मसाले, रेशीम, तागसारख्या वस्तूंची निर्यात केली जाते. युक्रेनहून आपण रसायन सामग्री, यंत्रे व इंजिन्स यांची आयात करतो. राऊरकेला आणि बोकारो येथील कोक बॅटरी पुनर्बांधणी संयंत्रांची कंत्राटे युक्रेनमधील कंपन्यांनीच मिळवली आहेत. 'झोमॅश' आणि 'नेव्होक्रॅमॅतोरस्की' या मशिन बिल्डिंग प्लँटस्मधून भारतास ऑक्सिजन कनव्हर्टर उत्पादन सामग्री पुरवली जाते. तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षेत्रांत उभय देशांचे सहकार्य वाढत आहे; मात्र सध्या युक्रेन देश उद्ध्वस्त केला जात असून, यामुळे भारतास पोहोचणारी झळ प्रचंड असणार आहे.

अर्थशास्त्री 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT