Latest

‘या’ बेडकासारखे माणसामध्येही उगवतील तुटलेले अवयव?

Shambhuraj Pachindre

न्यूयॉर्क : पाल, जलव्यालसारखे जीव आपले तुटलेले अवयव पुन्हा निर्माण करीत असतात. त्यापासून प्रेरणा घेऊन सध्या वैज्ञानिक नवे संशोधन करीत आहेत. माणसामध्येही असे होऊ शकेल का याबाबतचे हे संशोधन आहे. सध्या प्रोस्थेटिक्ससारख्या तंत्रात चांगलीच प्रगती झाली असली तरी मानवी अवयव नैसर्गिकरीत्या पुन्हा निर्माण करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. एका आफ्रिकन प्रजातीच्या बेडकामध्ये असा प्रयोग यशस्वी ठरला आहे!

'सायन्स अ‍ॅडव्हान्सेज' नावाच्या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतील वैज्ञानिक मायकल लेवीन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी 'जेनोपस लाविस' प्रजातीच्या बेडकामध्ये कापलेला पाय पुन्हा उगवून आल्याचे पाहिले आहे. 'रिजनरेटिव्ह मेडिसिन'चे लक्ष्य साध्य करण्यासाठीचे हे पहिले पाऊल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रयोगासाठी संशोधकांनी पाच औषधांचे एक कॉकटेल आणि सिलिकॉनपासून बनवलेल्या तसेच परिधान करता येण्यासारख्या 'बायोडोम' नावाच्या बायोरिअ‍ॅक्टरचा वापर केला होता.

हे कॉकटेल केवळ चौदा तासांसाठी लावण्यात आले होते. अठरा महिन्यांनंतर बेडकाचा हा नवा पाय पूर्णपणे हालचाल करीत आहे. नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमधील जीवविज्ञान विभागातील जेम्स मोनाघन नावाच्या तज्ज्ञांनी हा प्रयोग अत्यंत रोमांचित करणारा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

SCROLL FOR NEXT