Latest

‘या’ ग्रहाच्या वातावरणातही होते ‘ओझोन’च्या निर्मितीसारखी क्रिया

Arun Patil

वॉशिंग्टन : 'नासा'च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने आपल्या सौरमंडळाबाहेरील एका अशा ग्रहाचा शोध लावला आहे ज्याच्या वातावरणाची आण्विक आणि रासायनिक रचना वैज्ञानिकांच्या कुतुहलाचा विषय बनली आहे. पृथ्वीच्या वातावरणात ज्या क्रियेने ओझोनच्या स्तराची निर्मिती होत असते तशीच क्रिया या ग्रहाच्या वातावरणातही होत असल्याचे दिसून आले आहे.

हा ग्रह सूर्यापासून 700 प्रकाशवर्ष अंतरावर असून तो आपल्या ग्रहमालिकेतील शनि ग्रहासारखा दिसतो. या ग्रहाच्या वातावरणातील अभूतपूर्व अशा रासायनिक तपशीलांचा जेम्स वेब दुर्बिणीने छडा लावला आहे. अन्य ग्रहांवरील जीवसृष्टीशी निगडीत संकेत शोधण्यासाठीही या शोधाचा उपयोग होऊ शकतो. या ग्रहाचे नाव 'वास्प-39 बी' असे आहे. या ग्रहाच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड असल्याचा छडा ऑगस्टमध्ये लावण्यात आला होता व त्यावेळीही हा ग्रह चर्चेत होता. हा एक महत्त्वाचाच शोध होता.

आता तीन महिन्यांपेक्षाही कमी काळात या ग्रहाबाबत आणखी महत्त्वपूर्ण संशोधन झाले आहे. त्यावरून या ग्रहाचा इतिहास जाणून घेण्यासाठी मदत मिळू शकते. जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमीच्या संचालिका लॉरा क्रेडबर्ग यांनी सांगितले की सुरुवातीच्या निरीक्षणाबाबत जेम्स वेब टेलिस्कोप आमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक सरस ठरला. खगोलशास्त्रज्ञांनी जेम्स वेबच्या चार उपकरणांपैकी तीन उपकरणांचा वापर केला. त्यापासून मिळणार्‍या डेटाचे निरीक्षण करून त्यांची रासायनिक संरचना समजून घेण्यात आली.

खगोलशास्त्रज्ञांना असे आढळले की 'वास्प-39 बी' हा सल्फर आणि सिलिकेटयुक्त घनदाट ढगांनी वेढलेला आहे. ही रसायने ग्रहाच्या तार्‍याकडून येणार्‍या प्रकाशाशी क्रिया करतात आणि सल्फर डायऑक्साईड बनवतात. हे अगदी पृथ्वीवर ओझोनची निर्मिती होण्याच्या क्रियेसारखेच आहे. 'वास्प-39 बी' हा गुरूसारखा वायूचा गोळाच असलेला ग्रह आहे. त्याचा आकार मात्र गुरूच्या तुलनेत एक तृतियांश इतका आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT