सातारा; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा पाचवा दिवस आहे. शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या राजकीय पेचावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील वरीष्ठ नेते बैठका घेत आहेत.
दरम्यान, कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी आक्रमक भूमिका का घेतली यावर खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना पक्ष संपविण्याचा घाट घातला आहे. आम्ही पराभव केलेल्या राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपये निधी दिला जात होता, हेचं माजी आमदार भविष्यात आमदार होणार अशा गर्जना राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडून केल्या जात होत्या.
तसेच, राष्ट्रवादीकडून होत असलेल्या अन्यायाबाबत आम्हीं सर्व आमदारांनी वारंवार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली; पण काहीच उपयोग झाला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना वाचविण्यासाठीच सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांना ही रोखठोक भूमिका घेण्याची आग्रही मागणी केली. ज्यांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात आघाडी नको; तर नैसर्गिक पक्षासोबत युती हवी हा महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या अंतर्मनातील आवाज आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.