Latest

म्हैसाळ आत्महत्या प्रकरण : गावात कोणासही लागला नाही थांगपत्ता

अमृता चौगुले

मिरज; स्वप्निल पाटील : म्हैसाळ मधील सधन आणि उच्च शिक्षीत असलेला वनमोरे या भावंडांच हसत – खेळतं घर एकाएकी उद्ध्वस्त झाले. सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा फास दिवसेंदिवस आवळत गेल्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचे वनमोरे यांच्या कुटुंबियाने ठरविले आणि सारे होत्याचे नव्हते झाले.

डॉ. माणिक वनमोरे हे पशुवैद्यकीय डॉक्टर होते. त्यांची पत्नी रेखा, मुलगा आदित्य, मुलगी प्रतिभा, आई आक्काताई यांच्यासोबत एकत्र तर शिक्षक पोपट वनमोरे त्यांची पत्नी संगिता, मुलगी अर्चना आणि मुलगा शुभम हे एका ठिकाणी राहण्यासाठी होते.

वरील सर्व कुटुंबाची गावात सधन आणि उच्च शिक्षित म्हणून ओळख होती. रविवारी डॉ. माणिक यांच्या घरात सर्वजण एकत्र जमले होते. त्यावेळी सर्वांनी पाणीपुरी खाल्ली, त्यानंतर सर्वजण आईस्क्रीम खात टेरेसवर गप्पा मारत बसल्याचे देखील काही ग्रामस्थांनी पाहिले होते.

गप्पा-टप्पा झाल्यानंतर रात्री उशिरा सर्वजण टेरेसवरुन खाली खोलीमध्ये गेले आणि हा प्रकार झाला. वनमोरे कुटुंबियाच्या चेहर्‍यावर कधीही कसलेली टेन्शन दिसून आले नाही. त्यांनी कधीही कोणाला सावकारी पाशाबाबतीत सांगितले देखील नसल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. नेहमीप्रमाणे गवळ्याकडे दूध घेण्यासाठी डॉ. माणिक न गेल्याने गवळी दूध देण्यासाठी त्यांच्या घरी गेला अन् हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. डॉ. माणिक आणि पोपट हे दोघेही भावंडे गावात सुखा समाधानाने राहणारे कुटुंब होते. परंतु सोमवारचा दिवस उजाडला आणि सारे होत्याचे नव्हते समोर आलेे. कोणाच्या स्वप्नात देखील न येणारे वास्तव्य सार्‍या गावासमोर उजेडात आले होते.

सावकारी पाशातून अख्ख्या कुटुंबाने आपली जिवन यात्रा संपवली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. परंतु एखाद्याने आत्महत्या केल्याचा धक्का बसल्यानंतर अख्खं कुटुंब हंबरडा फोडते, परंतु या ठिकाणी हंबारडा फोडण्यासाठी देखील कोणी शिल्लंक राहिले नव्हते. त्यामुळे उरल्या सुरल्या चुलत भावंडे आणि भावकीतील आणि वनमोरे कुटुंबियांना ओळखणारे काहीजण धायमोकून रडत असल्याचे दिसून आले.

सावकरी पाशाबाबतीत दोघां भावंडांनी भावकीतील कोणालातरी याबाबत कल्पना जरी दिली असती तरी यातून काहीतरी तोडगा निघाला असता आणि हसत-खेळतं घर जसे आहे तसे गुण्या-गोविंदाने म्हैसाळमध्ये यापुढे देखील नांदत राहिले असते.

तर बिचार्‍या अर्चनाचा जीव वाचला असता

अर्चना ही कोल्हापूर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत रोखपाल म्हणून काम करीत होती. सर्वांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोपट यांनी त्यांची मुलगी अर्चना हिला देखील फोन करून घरी बोलावून घेतले होते. बिचार्‍या अर्चना हिला घरी आपला काळ बोलत आहे, याचा थांगपत्ता देखील लागला नसावा. रविवार हा सुट्टीचा दिवस साधून जर अर्चना ही कोल्हापुरातून म्हैसाळमध्ये आली नसती तर निदान ती तरी वाचली असती, अशी चर्चा गावात करण्यात येत होती..

SCROLL FOR NEXT