Latest

मोदींच्या पगडीवरील बदलला अभंग; सोशल मीडियावर चर्चा रंगल्याने देहू संस्थानचा निर्णय

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती व शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालण्यात येणार्‍या पगडीवर रेखाटण्यात आलेले अभंग बदलण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या एक दिवसापूर्वी पगडीवरील अभंगाची रचना बदलल्याने सोमवारी (दि. 13) सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौर्‍यानिमित्त त्यांच्या स्वागतासाठी तुकाराम महाराजांची पगडी बांधण्यात आली आहे. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या डोक्यावर चढविण्यात येणार्‍या बदामी रंगाच्या रेशमी पगडीवर मध्यभागी बुक्क्याचा वापर करून विठ्ठलाची प्रतिमा साकारण्यात आली. त्याखाली, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी हे अभंग सुलेखनाद्वारे रेखाटण्यात आले होते.

पूर्वीची पगडी

मात्र, पगडीवरील या अभंगांची चर्चा सोशल मीडियावर उलटसुलट रंगू लागल्याने अभंग बदलाचा निर्णय देहू संस्थानने घेतला. त्यानंतर आता विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हा अभंग रेखाटण्यात आला आहे. दरम्यान, ही पगडी 12 जून रोजीच देहू संस्थानकडे सुपूर्द करण्यात येणार होती. मात्र, या चर्चांमुळे पुन्हा पगडीवरील अभंग बदलण्याची वेळ पगडी साकारणार्‍यांवर आली. याबाबत गिरीश मुरूडकर फेटेवाले यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

अशी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पगडी

बदामी रंगाच्या रेशमी कापडापासून बनविलेल्या या पगडीचे वजन अवघे 50 ते 60 ग्रॅम आहे. ही पगडी पंतप्रधानांच्या मस्तकावर ठेवण्यात येईल तेव्हा चंदन आणि बुक्क्याचा टिळा आपोआप येईल, अशी रचना करण्यात आली आहे. पगडीवर मध्यभागी बुक्क्याचा वापर करून विठ्ठलाची प्रतिमा साकारण्यात आली. त्याखाली, विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हे अभंग सुलेखनाद्वारे रेखाटण्यात आले होते.

आताची पगडी.

पगडीच्या कानापाशी उजव्या बाजूला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि डाव्या बाजूला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. पगडीच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी केसही तयार करण्यात आली आहे. त्यावर दोन्ही बाजूला मखमली लोड ठेवण्यात आले असून त्यावर चिपळी आणि टाळ ही वारकर्‍यांची प्रतिके ठेवण्यात आली आहेत. उपरण्यासाठी वेगळे आणि विशेष कापड वापरण्यात आले आहे. उपरण्यावर तुकाराम महाराजांचे मराठी व हिंदीमधील अभंग रेखाटण्यात आले आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT