Latest

मोतीबिंदू रोखण्यासाठी वैज्ञानिकांनी तयार केले उपकरण

Arun Patil

वॉशिंग्टन : मोतीबिंदू रोखण्यासाठी वैज्ञानिकांनी एक छोटे उपकरण तयार केले आहे. जर मोतीबिंदू झाला असेल तर डोळ्यात प्रत्यारोपित केलेले हे उपकरण त्याला वाढू देत नाही. तसेच शस्त्रक्रियेशिवायही त्यावर उपचार करण्यासाठी मदत करते.

हे उपकरण डोळ्यांमध्ये कॅल्शियमचा स्तर वाढण्यापासून रोखते. ते किती प्रमाणात परिणामकारक आहे याच्या तपासणीसाठी सध्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत.

वैज्ञानिकांनी म्हटले आहे की हे इम्प्लांट मोठा बदल घडवून आणू शकते. जगभरातील वयस्कर लोकांमध्ये सध्या मोतीबिंदूची समस्या सार्वत्रिक झाली आहे. इंग्लंडमध्ये दरवर्षी मोतीबिंदूच्या 3.50 लाख शस्त्रक्रिया केल्या जातात. 65 वर्षे वयाच्या प्रत्येक तीनपैकी एका माणसाच्या एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू होतो.

डोळ्यांमध्ये सफेद चकती किंवा पॅच तयार होण्याला मोतीबिंदू म्हटले जाते. असे झाल्यावर माणसाला अस्पष्ट दिसू लागते. जर वेळीच उपचार केले नाही तर द़ृष्टीही जाऊ शकते. मोतीबिंदू ही वृद्ध लोकांमध्ये होणारी समस्या आहे.

धूम्रपान व मद्यपानामुळे मोतीबिंदूचा धोका आणखी वाढत असतो. वयाबरोबर शरीरातील काही अँटिऑक्सिडंटस् कमी होत असतात. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि डोळ्यातील भिंगाशी निगडीत ऊतींची हानी होऊ लागते.

त्यामुळे भिंगावर कॅल्शियम जमा होऊ लागते व अस्पष्ट दिसू लागते. आता यावर उपाय म्हणून अमेरिकन फार्मा कंपनी 'नेक्युटी फार्मास्युटिकल्स'ने एक नवे इम्प्लांट तयार केले आहे. 'एनपीआय-002' असे त्याचे नाव आहे. यामुळे शस्त्रक्रिया टाळणे बर्‍याच अंशी शक्य होऊ शकते असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT