Latest

‘ मॉब लिंचिंग ’ शब्द २०१४ नंतर आला

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंजाबमध्ये नुकतेच झालेल्या ' मॉब लिंचिंग 'च्या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत. ' मॉब लिंचिंग ' या शब्दाची उत्पत्ती 2014 नंतर झाल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. त्यानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही पलटवार करताना 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीचे समर्थन माजी पंतप्रधान राजीव गांधींनी केले होते, असे सांगत तेच 'लिंचिंग'चे जनक आहेत, असा आरोप केला.

राहुल गांधी यांनी मंगळवारी ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 2014 पूर्वी 'लिंचिंग' हा शब्द ऐकला नव्हता. हा शब्द 2014 मध्ये केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर माहिती झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी धन्यवाद मानतो! राहुल गांधी यांची ही खोचक टीका भाजपच्या जिव्हारी लागली.

त्यावर भाजप नेते अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीचे राजीव गांधी यांनी समर्थन केले होते. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावर उतरून 'खून का बदला खून' अशी घोषणाबाजी केली होती. त्यावेळी शीख महिलांवर अत्याचार करण्यात आले आणि शीख पुरुषांच्या गळ्यात जळालेले टायर घातले होते.

अजय मिश्रांविरोधात मार्च ( ' मॉब लिंचिंग ' )

राहुल गांधींनी मंगळवारी संसदेच्या महात्मा गांधी पुतळा परिसरात केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेणी यांच्याविरोधात मार्च काढला. मिश्रांना तुरुंगात जावेच लागेल. केंद्र सरकारने निर्लज्जपणे मिश्रांना मंत्रिमंडळात ठेवले आहे, असे राहुल म्हणाले.

अमित मालवीय यांनी दिली काँग्रेस काळातील दंगलीची यादी ( ' मॉब लिंचिंग ' )

काँग्रेसच्या सत्ताकाळात अनेक दंगली झाल्या असून, त्यात कित्येकांचे बळी गेले आहेत, असे सांगत मालवीय यांनी काँग्रेस काळात झालेल्या दंगलींची यादीच ट्विटरवर दिली. त्यामध्ये अहमदाबाद (1969), जळगाव (1970), मुरादाबाद (1980), नेल्ली (1983), भिवंडी (1984), अहमदाबाद (1985), भागलपूर (1989), हैदराबाद (1990), कानपूर (1992) आणि मुंबई (1993) या ठिकाणाच्या दंगली, हिंसाचाराचा उल्लेख मालवीय यांनी केला आहे.

SCROLL FOR NEXT