Latest

मेरी आवाजही पहचान है…

backup backup
  • मंदार जोशी

भूपेंद्र स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. त्यांनी गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. रफी, मुकेश, किशोर यांच्या काळात स्वतःचा चाहतावर्ग निर्माण करणं हे खरोखरीच खूप कठीण काम. परंतु, अंगभूत प्रतिभा, प्रचंड कष्ट आणि जीवनाबद्दलचा स्वच्छ द़ृष्टिकोन यामुळे भूपेंद्र आपला स्वतःचा ठसा या क्षेत्रावर उमटवू शकले.

'तुम्हारे आवाज का अगर तावीज बन सकता तो मैं जरूर बनाके पहन लेता।' हे उद्गार आहेत विख्यात कवी-दिग्दर्शक गुलजार यांचे आणि ज्यांच्याबद्दल हा भाव व्यक्त केला आहे, ते म्हणजे विख्यात गायक भूपिंदर सिंह. सर्वसामान्यांच्या मनातील भाव ओळखण्याचं सामर्थ्य गुलजारांकडे आहे. म्हणूनच तुमच्या आमच्या मनात बसलेल्या भूपेंद्र यांच्या आवाजाला गुलजारांनी थेट तावीजमध्ये नेऊन ठेवलं होतं. भूपेंद्र स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. गीतकारानं लिहिलेले शब्द स्वतः जगण्याचं भाग्य लाभलेल्या काही मोजक्या कलावंतांपैकी ते एक होते.

'…नाम गुम जायेगा
चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाजही पहचान है
गर याद रहे…'

सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा दैवी स्वर सोबत असूनही भूपेंद्र संगीत रसिकांच्या लक्षात राहिले आणि हे गाणं कानी पडलं की, या आवाजाची ओळख आपोआपच पटायची. अमृतसर-नवी दिल्ली-मुंबई असा त्रिवेणी प्रवास करीत भूपेंद्रजींची कारकीर्द घडली. त्या काळात जे सर्वसामान्य घरांमध्ये घडायचं, तेच भूपेंद्र यांच्या घरातही घडलं. भूपेंद्र यांचे वडील नाथा सिंग हे अमृतसरमधल्या एका महाविद्यालयात संगीताचे प्राध्यापक होते. त्यामुळे भूपेंद्र यांना खेळण्या-बागडण्याच्या वयातही संगीताची आराधना करावी लागली. अर्थातच भविष्याच्या द़ृष्टीनं ती त्यांना फलदायी ठरली. नाथा सिंह हे स्वतः चांगले सूफी गायक. शास्त्रीय संगीताची त्यांना जाण होती.

मेंडोलिन, सारंगी, सतार, दिलरूबा, तबला, हार्मोनियम… एवढी सारी वाद्यं त्यांनी आपल्या घरी जमवली होती की, एखादी लायब्ररीच तिथं सुरू करता आली असती. छोट्या भूपेंद्रला या लायब्ररीचा लाभ झाला. तसेच नाथा सिंग हे कडक शिस्तीचे असले तरी भूपेंद्रला त्यांनी या वाद्यांसाठी कसलंही बंधन घातलेलं नव्हतं. कोणतंही वाद्य तो कधीही वाजवू शकत होता. म्हणूनच अवघ्या सहाव्या-सातव्या वर्षी भूपेंद्र ही सर्व वाद्यं केवळ शिकले नाहीत, तर ती सर्व त्यांना वश झाली. यथावकाश नवी दिल्लीला 'ऑल इंडिया रेडिओ'मध्ये त्यांनी काम सुरू केलं. इथंही जेवणाच्या 1 ते 2 या वेळेत इतर लोक जेवत असताना भूपेंद्रजी विविध वाद्यांबरोबर सराव करीत असत. ते पाहून रेडिओ केंद्रामधील इंजिनिअर मंडळींची तिथं गर्दी होत असे. विख्यात संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांचं या केंद्रात एकदा येणं झालं आणि भूपेंद्रजींचं संगीताचं ज्ञान आणि त्यांच्या आवाजातील एक गझल ऐकून ते चाट पडले. तिथून निघताना मदन मोहननी भूपेंद्रना थेट चेतन आनंद यांच्या 'हकिकत' चित्रपटाच्या पार्श्वगायनाची ऑफर देऊन मुंबईत निमंत्रित केलं.

'होके मजबूर उसने बुलाया होगा…' हे ते अजरामर गीत! विशेष बाब म्हणजे महम्मद रफी, तलत मेहमूद आणि मन्ना डे यांसारख्या दिग्गज गायकांबरोबर भूपेंद्रना हे गाणं गाण्याची संधी मिळाली. हे गाणं खूपच गाजलं. त्या काळात हिंदी चित्रपट पार्श्वगायन क्षेत्रावर रफी, मन्ना डे, तलत मेहमूद यांच्यासारख्या दिग्गज गायकांचा प्रभाव होता. आपल्याला त्यांच्याप्रमाणे गाता येईल की नाही, याची भूपेंद्रना भीती होती. त्यामुळेच आपली डाळ इथं शिजणं कठीण आहे, अशी भीती वाटून भूपेंद्र पुन्हा दिल्लीला निघून गेले. पुढे 'हकिकत'चेच दिग्दर्शक चेतन आनंद यांनी त्यांना पुन्हा मुंबईत बोलावून घेतलं. त्यावेळी ते 'आखरी खत' चित्रपटाची निर्मिती करीत होते. खरं तर भूपेंद्र यांना नायक म्हणून या चित्रपटात घेण्याची त्यांची इच्छा होती. भूपेंद्र यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या मखमली आवाजाची चेतन यांना इतकी भुरळ पडली होती. भूपेंद्र यांची 'सिंगिंग हिरो' अशी प्रतिमा बनू शकते, असं चेतनजींना वाटत होतं. परंतु, भूपेंद्र नायक बनायला काही तयार नव्हते. अखेर आनंद यांच्या आग्रहाखातर त्यांनी या चित्रपटासाठी 'रूत जवां जवां, रात मेहरबान' हे आपलं पहिलं 'सोलो' गीत गायलं. कैफी आझमी यांनी लिहिलेलं, खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं भूपेंद्र यांच्यावरच चित्रित झालं होतं.

अशा प्रकारे भूपेंद्र हे नायक बनायला तयार झाले नसले तरी चेतन आनंदनी त्यांना गाण्याच्या रूपानं रुपेरी पडद्यावर आणलंच. मात्र कॅमेर्‍याला सामोरं जाण्याची कृती भूपेंद्रना फारशी भावली नाही. त्यांनी पुन्हा एकदा दिल्लीचा रस्ता धरला. या क्षेत्रात त्यांना त्यावेळी कोणी चांगलं मार्गदर्शन करणारेही भेटले नाहीत. अन्यथा हिंदी चित्रपटसृष्टीला गायक आणि अभिनय या दोन्ही गोष्टी करणारा एक चांगला अभिनेता मिळाला असता. भूपेंद्र यांच्या आयुष्याला आणखी एक निर्णायक वळण मिळालं, ते संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या भेटीमुळे. 1969 च्या सुमारास आरडींच्या खार येथील निवासस्थानी हे दोघे पहिल्यांदा भेटले. पहिलीच भेट अशी झाली की, या दोघांचं जन्मजन्मांतराचं नातं असावं. अगदी 'लव्ह अट फस्ट साइट!' तत्पूर्वी आरडींचा 'छोटे नवाब' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या माणसामधील गुणवत्ता भूपेंद्रना कळली होती. तसेच आरडींनाही भूपेंद्रमधला गायक-वादक चांगलाच उमगला होता. इथून सुरू झालं ते या दोघांच्या मैत्रीचं आणि अप्रतिम सुरावटींचं एक वेगळंच पर्व. भूपेंद्रना गिटार तर येतच होती. मुंबईत आल्यावर ते स्पॅनिश गिटार शिकले आणि आरडींच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी अनेक सुपरहिट आणि सदाबहार गाणी दिली.

'चिंगारी कोई भडके' (अमर प्रेम), 'प्यार हमें किस मोड पे ले आया' (सत्ते पे सत्ता), 'चुरा लिया है' (यादों की बारात), 'तुम जो मिल गये हो' (हंसते जख्म)… ही ती गाणी. 'दम मारो दम'साठी (हरे राम हरे कृष्ण) खुद्द देव आनंदच्या तोंडून या गाण्याची सिच्युएशन ऐकल्यानंतर भूपेंद्र भारावून गेले आणि त्यानंतर या गाण्यात त्यांनी आपल्या गिटारवादनाची जी कमाल केली, ती अजरामर ठरली. आर. डी. बर्मन यांच्याबरोबर भूपेंद्र या काळात एवढं काम करायचे की, त्यांना अन्य संगीतकारांबरोबर काम करायला वेळच मिळायचा नाही. त्यामुळेच मदनमोहन, नौशाद, जयदेव, खय्याम यासारख्या दिग्गजांबरोबर त्यांना मोजकीच गाणी करता आली. अगदी बप्पी लाहिरीसारख्या उडत्या चालींसाठी प्रसिद्ध असणार्‍या संगीतकाराबरोबरदेखील त्यांनी 'किसी नजर को तेरा' यासारखं वेगळं गाणं दिलं.

भूपेंद्र यांच्या आवाजाचा पोत वेगळा होता. तसेच त्या काळातले नायक पाहता, भूपेंद्र यांचा आवाज त्यांना रुळायला वेळ लागला. म्हणूनच भूपेंद्र हे पार्श्वगायनामध्ये फार काळ रमले नाहीत. तसेच कोणाकडे काम मागायला जाणं, हा त्यांचा स्वभाव नव्हता. पार्श्वगायनासाठी जी काही 'फिल्डिंग' लावावी लागते, ती लावण्याची त्यांची मानसिकता नव्हती. मुळात आपण काय वाट्टेल ते करून खूप मोठा गायक बनावं, अशीही त्यांची महत्त्वाकांक्षा नव्हती. जे मिळेल, त्यात ते आनंदी आणि समाधानी होते. त्यामुळेच या काळात जी मोजकीच गाणी त्यांच्या वाट्याला आली, त्याचं त्यांनी सोनं केलं. भूपेंद्र यांच्या गायकीच्या काळात संगीत क्षेत्रावर लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि कल्याणजी-आनंदजी यांचं मोठं वर्चस्व होतं. या दोघांकडे भूपेंद्र खूप कमी गायले आहेत. ती संख्या थोडी अधिक असती तर रसिकांना एक वेगळेच भूपेंद्र अनुभवायला मिळाले असते. 'मंजिले और भी है' या चित्रपटाला संगीतही त्यांनी या काळात दिलं. परंतु, सेन्सॉरच्या कात्रीमुळे या चित्रपटाची अशी काही वाताहात झाली की, भूपेंद्र यांना चित्रपटाला संगीत देण्यातही रस उरला नाही. पण भूपेंद्र हे एवढे प्रतिभावान कलावंत होते की, एक दरवाजा बंद झाला की आपोआप दुसरा त्यांच्यासाठी उघडायचा.

1980 च्या दशकात मग ते गझलगायकीकडे वळले आणि तिथंही त्यांनी आपला ठसा उमटवला. आपल्यात दडलेल्या संगीतकाराला त्यांनी गझलमधून व्यक्त केलं. अनेक दिग्गज शायरच्या गझल भूपेंद्र यांनी लोकप्रिय केल्या. 'एक अकेला इस शहरमें' हे भूपेंद्र यांचं गाणं कालांतरानं लोकगीत झालं. खेडेगावातून शहरांमध्ये संघर्ष करायला येणार्‍या प्रत्येकाचं ते जीवनगाणं झालं. तीच गोष्ट 'किसी नजर को तेरा' या गाण्याची. भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. अभिमानही होता. नवीन पिढीबरोबरही त्यांनी जुळवून घेतलं. त्याचाच पुरावा म्हणजे शमीर टंडनच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायलेलं 'न जिस दिन तेरी मेरी बात होती है' हे 'ट्रॅफिक सिग्नल' चित्रपटामधील गीत. कोणत्याही वेळी, काळी हे गाणं ऐकलं तरी भूपेंद्र यांचा आवाज आपल्याला झपाटून टाकतो. केवळ हे एकच गाणं नव्हे, तर त्यांनी गाजलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT