Latest

मेटामुळे मेटाकुटी

अमृता चौगुले

काका, हॅलो काका, इथे लवकर येता का?
काय झालं रे शिर्‍या? असा अवेळी फोन करतोयस! कुठे आहेस तू?
हॉस्टेलवरच आहे काका.

मग, असा घाबर्‍याघुबर्‍या काय बोलतोयस?
मी बराय काका. आपल्या गावचा सिद्धू घाबरा होऊन पडलाय इथे.
चांगला गब्रू आहे की तो. अचानक काय झालं त्याला?
दुपारपर्यंत बरा होता; संध्याकाळपासून कासावीस झालाय.
अन्नपाणी सगळं जिथल्या तिथे आहे ना?

हो काका. पुरता गपगार पडलाय तो. मध्येच सावध झाला, तर 'बंद करू नका,' 'प्लीज माझं बंद करू नका' असं गयावया करतो.
काय बंद झालंय त्याचं?
व्हॉट्सॅप. असं त्याच्या रूममधला पोरगा बोललेला.
व्हॉट्सॅपच ना? मग, असं अगदी प्राणवायू संपल्यासारखं काय करतोय तो?
व्हॉट्सॅप हा त्याच्यासाठी प्राणवायूच होता, आय शप्पथ!
हट् रे. ते काय? फार तर मोबाईलवरचं एक खेळणं ते. खेळणं हरवलं तर पोर घटकाभर रडेल. प्राण नाही सोडणार.
असं तुम्हाला वाटतं काका. आमच्या हॉस्टेलमधली पोरं सारखी फक्त फोनवरच असतात. फेसबुकवर, फेसटाईमवर, कँडीक्रशवर, गेमिंगमध्ये!

मेल्यांनो, घरच्यांनी हॉस्टेलवर ठेवलं ते शिकायला ना रे?
ते आम्ही करतोच हो. फक्त मोबाईलसोबत करतो. आपला सिद्धू तर सारखा व्हॉट्सॅपवरच असायचा. अभ्यास करताना, कॉलेजला जाता-येताना, रस्त्यात, मेसमध्ये जेवतांना असं बघावं तेव्हा व्हॉट्सॅप बघत असायचं बेणं.
म्हणजे व्यसनच म्हणायचं की एक प्रकारचं?
काय माहिती! मोबाईल जवळ नसेल, तर हवेतल्या हवेत बोटं फिरवायला लागतो तो, माहितीये?
मग, त्याचा व्हॉट्सॅप कोणी घालवला?

मेटा कंपनीने.
बाटा, टाटा या कंपन्या ऐकल्या. ही मेटा काय आहे?
व्हॉट्सॅपची जन्मदात्री!
मग, याने तिचं काय घोडं मारलं?
नियम तोडलेन, बेकायदा गोष्टी केल्यान.
काय सांगतोस? मुद्दाम?
नाही हो. सिद्धू जाम टाईमपास करायचा व्हॉट्सॅप वर. वाट्टेल ते फॉरवर्ड करायचा. खोटेनाटे मेसेजेस पाठवायचा. त्याला फसणार्‍यांची मजा बघत बसायचा. त्याचा खेळ व्हायचा, दुसर्‍यांचा जीव जायचा. म्हणून एकदा मेटा कंपनीने जाहीर पण केलेलं, व्हॉट्सॅपचा गैरवापर केलात, तर तुमचं अकाऊंट बंद होईल, न कळवताच?

हो. कळवून किंवा न कळवता. मेटा कंपनीच्या इच्छेनुसार. याला कळवलं नव्हतं वाटतं, म्हणून याने शॉक खाल्ला!
शॉकच कशाला? दोन-चार थपडाही खा म्हणावं माझ्या.
काका, जरा दमानं! आधीच गांगरून गेलाय बिचारा. हाताला चाळा नाही, डोक्याला विषय नाही. काही सुचेना.
अरेरे! काय रे ही अवस्था तुमची? कोणा त्या मेटावाल्यांनी मेटाकुटीला आणलं की रे तुम्हाला. असे कसे रे मोबाईलच्या हातचं खेळणं झालात तुम्ही? आता हॉस्टेलवर येऊन सरळच करतो त्याला.
त्याचा फोन जप्त करून वगैरे? नाही रे. समजा एक फोन गेला, तर दुसरा मिळवेलच की तो! मुद्दा तो नाहीये. असल्या तंत्रज्ञानाचा आधार घ्यायचा की, आहारी जायचं, हे कळायला हवं तुम्हाला. पोहोचतोच हॉस्टेलवर अर्ध्या तासात. तोवर या सिद्धूबाबाला सांभाळ जरासा, मग मी आहे आणि तो!

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT