Latest

मेंदूत शिरून ‘सर्जरी’ करेल रोबोट!

Arun Patil

कॅलिफोर्निया ; वृत्तसंस्था : मानसिक आजार दुरुस्त करायचे, तर रुग्णाच्या मेंदूत रोबोट पाठविणे एखाद्या विज्ञान चित्रपटासारखेच कुणालाही काल्पनिक वाटणार; पण अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील 'बायोनॉट लॅब' ते वास्तवात आणण्यासाठी जीवाचे रान करत आहे. संशोधनाचे यश जवळपास आवाक्यात आलेले आहे. हा रोबोट इंजेक्शनद्वारे मेंदूत सोडून त्याद्वारे अत्यंत क्लिष्टशस्त्रक्रिया पार पाडेल.

येत्या दोन वर्षांत या नव्या वैद्यकीय तंत्रज्ञानाची मानवावर 'क्लिनिकल ट्रायल' (चाचणी) होईल, असा आत्मविश्वास संशोधकांना आहे. मेंदूतील रक्ताच्या गाठी, कॅन्सर ट्युमर्स, एपिलेप्सी, पार्किन्सन्स, स्ट्रोक (आघात) यासारख्या आजारांचा उपचारही या तंत्रज्ञानाने शक्य होणार आहे. डँडी-वॉकर सिंड्रोम या आजाराचा उपचारही शक्य होणार आहे. हा आजार जन्मापासूनच जडणारा आजार आहे. मेंदू आणि शरीराचा परस्परांशी ताळमेळ या आजाराने पार कोलमडून जातो.

हे सगळे आजार रोबोट दुरुस्त कसे करणार, हा प्रश्न कुणालाही पडणे स्वाभाविक आहे, तर हा रोबोट कसा असेल ते आधी जाणून घेऊ. अतिसूक्ष्म आकाराचा हा रोबोट म्हणजे एक विशिष्ट धातूचे सिलिंडर आहे. मायक्रोस्कोपमधून (सूक्ष्मदर्शक) पाहिल्यास तो बंदुकीच्या गोळीसारखा दिसतो. हा रोबोट आधीपासून तयार केलेल्या कार्यक्रमानुसार आपला मार्ग व कृती ठरवतो तसेच पूर्ण करतो.

रोबोटला मेंदूत पाठविण्यासाठी ऑप्टिकल, अल्ट्रासॉनिक नव्हे, तर मॅग्नेटिक एनर्जीचा (चुंबकीय ऊर्जा) वापर करण्यात येणार आहे. नाजूक भागाला कुठलेही नुकसान होऊ नये, हा त्यामागचा हेतू आहे. 'बायोनॉट लॅब'ने जर्मनीतील मॅक्स प्लांक रिसर्च इन्स्टिट्यूटसोबत हे रोबोट विकसित केले आहेत. रुग्णाच्या डोक्यावर 'मॅग्नेटिक कॉईल' लावले जाईल. ते कॉम्प्युटरला जोडलेले असेल आणि त्याच्या मदतीने रोबोटला योग्य त्या दिशेने नेता येईल तसेच मेंदूतील रोगग्रस्त भागावर उपचार केला जाईल. डिव्हाईस कुठेही सहज नेता येईल, असे आहे. एमआरआय स्कॅनच्या तुलनेत दहा ते शंभर पटीने वीज यात कमी खर्ची पडते.

जनावरांवर चाचणी झाली यशस्वी

मेंढ्या, डुकरांवर या तंत्राची चाचणी यशस्वी झालेली आहे, हे विशेष! मानवासाठीही हे तंत्र सुरक्षित आणि परिणामकारक असेल, असा प्राथमिक निष्कर्ष या चाचणीतूनच काढण्यात आलेला आहे. 'बायोनॉट लॅब'ला संशोधनासाठी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मान्यताही प्राप्त झाली आहे.

मेंदूसारख्या अत्यंत नाजूक भागात अत्यंत सुरक्षितपणे सहज सोडले जाऊ शकतात, इतका या रोबोटचा आकार सूक्ष्म आहे. मग चुंबकीय ऊर्जेच्या मदतीने या रोबोटना दिशा दिली जाते आणि त्यांच्याकडून मेंदूत हवे ते काम करून घेतले जाऊ शकते.
– मायकेल शॅपिगेल्माकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, बायोनॉट लॅब, कॅलिफोर्निया, अमेरिका

SCROLL FOR NEXT