Latest

मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामिनाला ईडीचा विरोध

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आ. हसन मुश्रीफ यांच्या नाविद, आबिद व साजिद या तिन्ही मुलांना अटकपूर्व जामीन देण्यास ईडीने विरोध केला आहे. मुंबई सत्र न्यायालयात यासंदर्भात झालेल्या सुनावणीवेळी हा विरोध करणार्‍या ईडीला यासंदर्भात लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी येत्या तीन मार्चपर्यंत स्थगित ठेवली आहे.

मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. राजकीय हेतूने अटक होण्याची शक्यता असल्याचा उल्लेख या अर्जात आहे. न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर विशेष पीएमएलए न्यायालयात हे अर्ज करण्यात आले आहेत.

11 जानेवारी रोजी आयकर विभागाने हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्ती प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना येथे छापे टाकले होते. मुश्रीफ यांच्या कन्येच्या सासने मैदानाजवळील घरी तसेच पुण्यातही मुश्रीफ यांच्या संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते.

एक फेब्रुवारी रोजी मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय तसेच सेनापती कापशी येथील व गडहिंग्लज येथील हरळी येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर छापे घातले होते. त्यानंतर जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांना ईडीने ताब्यात घेऊन तपासासाठी मुंबईला नेले होते. 70 तासांनंतर त्यांची सुटका केली होती. त्यानंतर मुश्रीफ यांच्या मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

SCROLL FOR NEXT