Latest

मुलांचे दंतारोग्य

दिनेश चोरगे

लहान मुलांना गोळ्या, चॉकलेट किंवा काही औषधे यांच्या सेवनामुळे दात किडीची समस्या भेडसावते; पण योग्य पद्धतीने दात घासणे, मुखारोग्य जपणे आणि मुले काय खातात, पितात याकडे लक्ष ठेवल्यास दात किडण्याच्या समस्येला प्रतिबंध करता येतो.

लहान मुले जशी मोठी होऊ लागतात तसे त्यांचे दातही किडतात; पण काही साध्याशा गोष्टी अमलात आणल्यास दात किडण्यासारख्या समस्या नक्‍कीच दूर केल्या जाऊ शकतात. आपल्या मुलाचे निर्व्याज हसू तसेच राखण्यात मदत होऊ शकते.
तपासणी करा ः बाळाचा पहिला वाढदिवस झाला की, त्याचे दात दंतवैद्याकडे दाखवून आणा. प्रतिबंधात्मक काळजी घेतल्यास पुढील मोठे खर्च वाचवता येतात. एका अहवालानुसार पाच वर्षांच्या मुलाला डॉक्टरना दाखवण्यापेक्षा लहान वयात मुलांना दंतवैद्याकडे नेल्यास दातांची काळजी घेण्याच्या खर्चात 40 टक्के कपात होते.

चांगल्या सवयी : मुलांना चांगल्या सवयी लावण्यामध्ये मुख्य सवय आहे ती दात योग्य तर्‍हेने घासणे. हे काम अर्थातच आव्हानात्मक असते. पण, बाळाचे दात येण्यापूर्वी त्यांच्या हिरड्या बोटाने स्वच्छ केल्या पाहिजेत. त्यासाठी लहान बाळांसाठी मिळतो तो ब्रश आणि पाणी याचा वापर केला जाऊ शकतो किंवा स्वच्छ कापडानेही बाळांच्या हिरड्या पुसून घेतल्या जाऊ शकतात. बाळाचे दात येऊ लागले की, छोट्या ब्रशने आणि फ्लुरॉईड असणार्‍या टूथपेस्टने दोन वेळा त्यांचे दात घासावेत.

फ्लॉसिंग :  दात स्वच्छ राहण्यासाठी दातांच्या फटीत अडकलेले कण निघण्यासाठी फ्लॉसिंगची आवश्यकता असते. त्याचे तंत्र डॉक्टरांकडून शिकूनच घ्यावे लागते. झोपण्यापूर्वी ब्रश करून फ्लॉस करावे. त्यानंतर मात्र काही पाण्याव्यतिरिक्‍त काहीही खायला देऊ नये. माऊथवॉशचा वापर करावा की नाही, याबद्दलही दंतवैद्य सल्ला देऊ शकतात. अर्थात, बाळाला तोंडात गुळणा करून त्याची चूळ भरता येईपर्यंत, तरी त्याचा वापर करता येणार नाही.

दुधाची बाटली : बाळाला शक्यतो बाटलीची सवय लावू नका. रात्री झोपताना बाटलीतून दूध प्यायच्या सवयीने दात किडण्याचा संभव असतो. दूध किंवा फळांचे रसही त्याला बाटलीतून देऊ नका. साखरयुक्‍त पेयांच्या अतिसेवनाने किंवा बाजारात तयार स्वरूपात मिळणार्‍या गोड पेयांच्या सेवलनाने दात किडण्यास सुरुवात होते. रात्री झोपताना द्यायचे असेल, तर फक्‍त पाण्याचीच बाटली द्यावी.

फळांचे रस : आरोग्यदायी असल्याने फळांचे रस मुलांना द्यायचा पर्याय पालक निवडतात. त्यात साखर घालतात. साहजिकच सतत हे रस प्यायल्याने त्यातील साखरेमुळे दात किडू लागतात. दिवसभरात फक्त चार औंस दूधच बाळाला द्यावे. साखरेचे काही पेये असतील, तर ती जेवणाच्या वेळी द्या. फळांचे रसही कधीतरी मौज म्हणून द्यावे.

सिपर : बाटलीची सवय सोडवण्यासाठी पालक मुलांना सिपर द्यायला सुरुवात करतात. मुले मात्र दिवसभर सिपरनेच पाणी पिणे, दूध पिणे करत राहतात; पण सिपरचाही अतिवापर झाल्यास पुढचे दात पाठीमागून किडतात. विशेषतः त्यात साखरयुक्त पेेये असतील, तर दात किडण्याचा धोका अधिक.

पॅसिफायर : बाळाला दात येताना हिरड्या शिवशिवतात. त्यासाठी हिरड्यात धरून चावण्याची एक रिंग असते. त्याला पॅसिफायर म्हणतात किंवा चोखणं म्हणतात. बाळ दोन-तीन वर्षांचे झाले की, हे बंद करावे. कारण, याचा अतिवापर केल्यास दात सरळ रेषेत येतील की नाही, याची चिंता भेडसावू लागते. तसेच तोंडाचा आकारही बदलू शकतो. तीन वर्षांनंतरही मूल चोखणे वापरत असेल, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे इष्ट.

गोड चवीची औषधे : लहान मुलांना देण्यात येणारी औषधे गोड आणि फळांच्या चवीची असतात. ती गोड असल्यामुळे दाताला आणि हिरड्यांना चिटकून राहतात. त्यामुळे दातांची कीड वाढण्याचा संभव असतो. ज्या मुलांना अस्थमा आणि हृदयविकार यांच्याशी संबंधित औषधे चालू असतात त्यांचे दात लवकर किडतात. प्रतिजैविके आणि काही अस्थम्याची औषधे यांच्यामुळे कँडिडा म्हणजेच यीस्टची निर्मिती होण्यास अधिक वाव असल्याने दातांमध्ये बुरशीजन्य संसर्ग ज्याला ओरल थ्रश असेही म्हटले जाते. याचे लक्षण म्हणजे जीभेवर किंवा तोंडाच्या आतल्या बाजूला दह्यासारखे पांढरट चट्टे दिसून येतात. अशा परिस्थितीत आपल्या मुलाने किती वेळा दात घासले पाहिजेत, याची माहिती दंतवैद्याकडून घेतली पाहिजे.

संयम बाळगा : लहान मुले दात घासायचा कंटाळा करताना दिसतात. साधारणपणे दोन वर्षांची झाल्यावर मुले ब्रश करू लागतात. बहुतांश वेळा स्वतः ब्रश करण्याचा कंटाळाच असतो. सहसा सहा वर्षांची होईपर्यंत त्यांना एकट्याला ब्रश करायचेच नसते. काही वेळा अगदी दहा वर्षांची होईपर्यंत मुलांना दात घासण्याचे योग्य तंत्र शिकवावे लागते.

उशिरापर्यंत वाट पाहू नका : मुले दिवसभर खेळतात, मस्ती करतात त्यामुळे ती रात्री कंटाळलेली असतात त्यांना दात घासायचा कंटाळा असतो. दात घासा, फ्लॉस करा आणि गुळणा करा हे सर्व त्यांच्यासाठी कंटाळवाणे असते. त्यामुळे अगदी झोपेची वेळ होई पर्यंत वाट न पाहता मुलांचे जेवण झाले की, दात घासायला सांगावे.

आवडीची टूथपेस्ट : निवडलेल्या टूथपेस्ट मधून मुलांना त्यांची टूथपेस्ट निवडू द्या. म्हणजे दात घासण्यातील त्यांचा रस वाढतो.
प्रेरणा द्या ः थोड्या मोठ्या मुलांना काही गोष्टींचे आकर्षण असते. त्यांना दात घासले की, स्टीकर किंवा त्यांच्या वहीवर स्टार दिले, तर अधिक मजा वाटते किंवा मित्रमैत्रिणींबरोबर दात घासण्याचे एकत्रित कार्यक्रम करता येऊ शकतो. आपल्या पेक्षा मोठ्यांचे पाहूनही मुले अनेक गोष्टींची प्रेरणा घेतात. त्यामुळे त्यांच्या पेक्षा थोडी मुले त्यांना प्रेरक ठरू शकतात.

डॉ. निखिल देशमुख

SCROLL FOR NEXT