मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कॉर्डेलिया क्रूझ पार्टी व अन्य प्रकरणी नवाब मलिक यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिक यांचे 'वेल डेन' असे कौतुक केले. महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या षड्यंत्रात मलिक यांनी केंद्रीय यंत्रणांचा बुरखा फाडला असून, आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असे सांगत सर्व मंत्र्यांनी मलिकांना एकमुखी पाठिंबा दिला.
कॉर्डेलिया प्रकरण खंडणी व वसुलीसाठी घडवून आणल्याचा आरोप नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केला. महाराष्ट्रासह बॉलिवूडला बदनाम करण्याचा हेतू असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील पक्षांनी केला होता. भाजप नेते, एनसीबी व समीर वानखेडे यांचे एकमेकांशी संबंध असल्याचा आरोपही मलिक यांनी केला व त्याचे धागेदोरे थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपर्यंत जोडले.
मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपीकडून मलिकांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. त्यानंतर मलिक यांनी बुधवारी फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा 'धमाका' केला. त्यानंतर कॅबिनेट बैठकीसाठी पोहचलेल्या मलिकांचे सर्व सहकारी मंत्र्यांनी कौतुक करत सर्वजण त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही 'वेल डन, महाविकास आघाडी म्हणून आम्ही आपल्या पाठीशी आहोत' अशी ग्वाही दिली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस व नवाब मलिक यांना चिखलफेक थांबवण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत मलिक म्हणाले की, फडणवीस यांनी माझ्यावर आरोप केल्याने मी त्यांना केवळ प्रत्युत्तर दिले आहे. माझ्याकडे अजून भरपूर दारूगोळा आहे. फडणवीस यांनी माझ्यावर खोटे आरोप करण्याचे बंद केले तर मी सुद्धा शांत राहीन, असे मलिक यांनी सांगितले.
गेले काही दिवस मानदुखीचा त्रास होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर लगेच एच . एल. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले. त्यांना डॉक्टरांनी मानेवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला असून त्यावर तपासणीअंती निर्णय घेतला जाईल. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलेल्या आवाहनात, आपण दोन-तीन दिवस रुग्णालयात राहून उपचार घेणार असल्याचे सांगितलेे.
टेलिकॉन्फरन्स पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या पंढरपूर पालखी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री मानेला पट्टा लावून सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी रिलायन्स रुग्णालयांच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली होती. डॉक्टरांनी त्यांना मानेवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. आधी घरीच उपचार करण्याचे प्रयत्न होते. मात्र दुखणे बळावण्याची शक्यता असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. बुधवारी संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठक संपताच ते रुग्णालयात पोहोचले.
रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यानिमित्ताने एकच सांगायचे आहे. कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने 10 कोटींचा टप्पा ओलांडला असला, तरी सर्वांनी दोन डोस घेणे अत्यावश्यक आहे. आपला जीव सुरक्षित ठेवण्यासाठी लगेच जवळच्या केंद्रावर जाऊन कोरोनाविरोधी लस घ्या एवढीच विनंती करतो, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोरोनाचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरू राहावीत म्हणून आम्ही सगळे न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हटलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन-तीन दिवस तिथेच राहून उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.