मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींच्या खंडणीवसुली आरोपांची चौकशी करणार्या सीबीआयने आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावले आहे.
देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर मात्र बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी कोणताही प्रयत्न सीबीआयकडून होताना दिसत नाही. दुसरीकडे परमबीर यांच्या आरोपावरून मात्र चौकशीचे सत्र सीबीआयने सुरू ठेवलेले दिसते.
परमबीर यांच्या आरोपासंदर्भात कुंटे आणि पांडे या दोघांचे जबाब सीबीआयला नोंदवायचे आहेत. दोघांनीही यापूर्वी सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. यापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या अधिकार्यांनी सीबीआयसोबत चर्चा केली होती.
त्यामुळे सीबीआयला जबाब नोंदवायचा असल्यास आमच्या कार्यालयात येण्याची विनंती दोन्ही अधिकार्यांनी केली होती. आता सीबीआयने दोघांनाही प्रत्यक्ष येऊन जबाब नोंदवण्याचे समन्स बजावले आहे. अर्थात त्यात तारीख नाही. ही तारीख सीबीआयकडून नंतर दिली जाईल, असे कळते.
परमवीर सिंह यांनी केलेला 100 कोटींच्या वसुलीचा आरोप, पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस अधिकार्यांच्या बदल्या मधील गैरव्यवहारात दिलेला अहवाल आदी बाबत सीबीआय राज्याचे मुख्य सचिव कुंटे आणि पोलीस महासंचालक पांडे यांना प्रश्न विचारणार आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना लूकआऊट नोटीस बजावली असतानाही ते परदेशात कसे गेले, असा सवाल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी केला.
वळसे पाटील म्हणाले. केंद्रीय गृह मंत्रालयासोबतच आम्ही देखील परमबीर सिंह यांना शोधत आहोत. मी ऐकले आहे की ते भारताबाहेर गेले आहेत. पण एक सरकारी अधिकारी म्हणून ते सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत. परमबीर सिंग हे रशियात असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू असली तरी त्यास दुजोरा मिळालेला नाही.