Latest

मुंबईत मनसे, भाजप नेत्यांना नोटिसा

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई पोलिसांनी आतापर्यंत मनसे आणि भाजप नेते व कार्यकर्ते अशा सुमारे 1 हजार 500 हून अधिक जणांना नोटिसा बजावल्या आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई पोलीस दलातील उच्चपदस्थ आणि वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेत कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने सूचना दिल्या. पोलिसांनी शहरातील मशिदींसह अन्य महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणांचा बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांसह जलद प्रतिसाद पथके, दंगल नियंत्रण पथके, बॉम्बशोधक व नाशक पथके, श्वान पथके तैनात केली आहेत.

सामाजिक तेढ निर्माण करणार्‍यांना चाप बसवण्यासाठी आणि शहरात कोणीही कायदा हातात घेऊ नये म्हणून पोलिसांनी नोटिसा बजावण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मनसे आणि भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांसह एकूण 855 जणांना 149 अंतर्गत नोटिसा बजावल्या असून, 465 जणांवर 15 दिवसांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे. त्याशिवाय 172 जणांवर भादंवि 151 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मुंबईबाहेरून येणार्‍यांवरही करडी नजर ठेवली आहे.

शहरात कोणी भोंगे किंवा अन्य तत्सम साहित्य मागवले आहे का, यासह अन्य हालचालींवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. घाटकोपर पोलिसांनी मनसे नेते महेंद्र भानुशाली यांच्या कार्यालयातून भोंगे जप्त करत त्यांना ताब्यात घेतले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणानंतर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजताच ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानाबाहेर मनसैनिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट तपासण्यास सुरुवात केली असून, जातीय तेढ निर्माण करू शकणार्‍या पोस्ट हटवण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील धार्मिक वातावरण सलोख्याचे राहावे यासाठी समाज माध्यमांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. यासाठी सोशल मीडिया लॅब, सायबर पोलीस यांना अलर्टवर ठेवण्यात आले आहेत.

रस्त्यांप्रमाणे कायदेशीर लढाई : देशपांडे

राज ठाकरे यांना अटक झाल्यास आम्ही सर्व प्रकारच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. कायदेशीर लढाईदेखील लढण्याची आमची तयारी आहे, असे तेे म्हणाले. भोंगे काढण्याची कारवाई करण्याचे सोडून आम्हालाच नोटिसा पाठवल्या जात आहेत. आम्ही अतिरेकी आहोत का, असा सवाल त्यांनी केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे मात्र, मुस्लिमांचे लांगुलचालन करत आहेत, असे देशपांडे म्हणाले.

नोटिसा येतच असतात : सरदेसाई

नितीन सरदेसाई म्हणाले, अशा नोटिसा येतच असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे नाही, हे सरकारने ठरवले आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक सतीश कसबे यांनी ही नोटीस दिली आहे.

हे तर मुघल सरकार : नांदगावकर

औरंगाबादमधील सभेत राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. ते सभेत बोलल्यानंतर नोटीस पाठवली, पण वर्षानुवर्ष अनधिकृत मशिदी बांधल्या जात आहेत, त्यावर भोंगे वाजवले जात आहेत. त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे हे सरकार मुस्लिमांचे तुष्टीकरण करत आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली. हे आघाडी नव्हे तर मुगल सरकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारकडून दडपशाही केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

ठाण्यात 1400, नवी मुंबईत 150 पदाधिकार्‍यांना नोटिसा

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह पक्षनेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर संभावित संशयित 1 हजार 400 जणांना फौजदारी कायदा कलम 149 प्रमाणे पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.कोणत्याही धार्मिक स्थळापासून दोनशे मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव, घोषणाबाजी, गायन, वाद्य वाजवणे, विनापरवाना ध्वनिक्षेपकाचा वापर, रॅली, मिरवणुका आणि सभा घेण्यास 27 जूनपर्यंत ठाणे पोलिसांतर्फे बंदी घालण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 350 पोलीस अधिकारी व 7 हजार 500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आरपीएफचे नऊ प्लाटून व 300 होमगार्ड मदतीसाठी सज्ज आहेत.

नवी मुंबई पोलिसांनी 20 ठाण्यांच्या हद्दीत मनसेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना 150 नोटिसा बजावल्या आहेत. शिवाय दोन्ही परिमंडळांत 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. पनवेल आणि वाशी या दोन परिमंडळांची बंदोबस्ताची जबाबदारी डीसीपी शिवराज पाटील आणि विवेक पानसरे यांच्यावर सोपवली असल्याची माहिती डीसीपी क्राईम सुरेश मेंगडे यांनी दिली. बंदोबस्तासाठी 2 हजार पोलीस कर्मचारी, अधिकारी, राज्य राखीव दलाची एक तुकडी, होमगार्ड तैनात केले आहेत.

पोलिसांनी आदेशाची वाट पाहू नये : मुख्यमंत्री

मनसेकडून मशिदींवरील भोंग्यांविरोधात बुधवारी होणार्‍या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला असून पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नये, असेही सांगितले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

त्यानंतर त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना फोनवरून चर्चा करूनदेखील सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलीप वळसे-पाटील आणि संजय राऊत यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत मनसेने जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना कारवाईची मोकळीक देण्यावर एकमत झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT