Latest

मुंबई : सोमय्या पिता-पुत्रांच्या दारावर लावले समन्स

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात अटकेची टांगती तलवार कायम असल्याने गायब झालेले भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या दारावर आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीचे समन्स मंगळवारी चिकटवले.

दोघा पिता-पुत्रांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी 11 वाजता हजर होण्यास बजावले आहे. विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली निधी गोळा करून अपहार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यापासून सोमय्या पिता-पुत्र 'नॉट रिचेबल' आहेत. आयएनएस विक्रांत घोटाळ्यातील रक्कम अधिक असल्याने मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे सोपविण्यात आला आहे.

या प्रकरणी सत्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने मंगळवारी सोमय्यांचे मुलुंडमधील निवास्थान आणि कार्यालय गाठले. अटकेची टांगती तलवार असल्याने सोमय्या पिता-पुत्र घरी नव्हते. अखेर पोलिसांनी हे समन्सचे पत्र सोमय्या यांच्या घराच्या दरवाजावर चिकटवले. मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमय्या यांच्या कार्यालयाची झडतीसुद्धा घेतली व काही कागदपत्रांची तपासणी करत उपस्थित कर्मचार्‍यांची चौकशी केली.

प्रसंगी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन जामीन मिळवण्याची तयारी असल्याने सोमय्या पिता-पुत्र या चौकशीला हजर राहाण्याची शक्यता कमी असल्याचे समजते.

मानखुर्दमधील रहिवासी माजी सैनिक बबन भोसले (53) यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलिसांनी 7 एप्रिल रोजी फसवणूक आणि अपहार केल्याचा गुन्हा दाखल केल्यापासून दोघेही पोलिसांसमोर आलेले नाहीत. एकदा त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण देत वेळ वाढवून मागितली आणि नंतर तर, 13 एप्रिल नंतर हजर होऊन तपासाला सहकार्य करणार असल्याचे पत्रातून सांगितले होते. तथापि, दोघेही पोलीस ठाण्याकडे फिरकले नाहीत.

आज उच्च न्यायालयात

अटक टाळण्यासाठी किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सोमय्यांचे चिरंजीव नील यांचाही अटकपूर्व जामीन अर्जही मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळल्याने ते ही उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

सोमय्या यांच्यासह मुलगा निल यांचे फोनसूद्धा नॉटरीचेबल असून स्वीय सहायकांच्या नंबरवर वळविण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांची तीन पथके सोमय्या पिता-पुत्राचा शोध घेत आहेत.

दोघेही समन्सनुसार चौकशीला हजर न राहील्यास पोलिसांकडून त्यांना फरार आरोपी घोषीत करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT