Latest

मुंबई : यंदा गुढीपाडव्याला स्वागतयात्रांना जमावबंदी?

Arun Patil

मुंबई/डोंबिवली/ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : येत्या 2 एप्रिल रोजी गुढी पाडव्याला निघणार्‍या मराठी नववर्षाच्या स्वागतयात्रा जमावबंदीच्या तडाख्यात सापडल्याचे चित्र आहे. पोलिसांनी 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे गिरगावात स्वागतयात्रा निघणार नाही. डोंबवलीत फक्‍त गणेश मंदिर संस्थानची पालखी निघेल. मात्र, रविवारी विविध संस्थांची बैठक डोंबिवलीत होत असून, या बैठकीत स्वागतयात्रांबद्दलची भूमिका स्पष्ट होईल.

तब्बल दोन वर्षांनंतर गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या स्वागत यात्रा निघतील अशी आशा होती. या आशेवर पोलिसांनी लागू केलेल्या जमावबंदीने पाणी फेरले आहे. ही जमावबंदी न उठल्यास निर्बंधमुक्‍त मुंबईतही मराठी नववर्षाचे स्वागत बंदीस्त सभागृहांमध्येच करावे लागेल. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित गिरगावातील पारंपरिक हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अर्थात गिरगावचा पाडवा गेली दोन दशके आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.

मुंबई निर्बंधमुक्‍त होऊनही जमावबंदीमुळे यंदाचा पाडवा मात्र बंदिस्त सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येणार असल्याचे या प्रतिष्ठानने जाहीर केले. निर्बंधमुक्‍त मुंबईत स्वागतयात्रांना मनाई कशासाठी? ऐन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जमावबंदी लागू करण्याचे कारण काय? या प्रश्‍नांची उत्तरे कुणीही पोलीस अधिकारी देण्यास तयार नाही. मात्र, सगळीकडे स्वागतयात्रा काढू नका, असा प्रशासकीय निरोप मात्र विशेषत: गिरगाव आणि डोंबिवलीत गेला आहे.

डोंबिवलीत आज बैठक

डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे यंदा फक्‍त पालखी काढली जाईल. देखावे आणि चित्ररथांसह शोभायात्रा निघणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. श्री गणेश मंदिर संस्थानचे विश्‍वस्त प्रवीण दुधे यांनी पुढारीला सांगितले की, आम्ही स्वागतयात्रेसाठी विष्णूनगर आणि रामनगर पोलीस ठाण्यांना परवानगी मागितली होती. मात्र ती मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही फक्‍त पालखी काढण्याच्या तयारीत आहोत. रविवारी डोंबिवलीतील विविध संस्थांची बैठक आयोजित केली आहे. आता चार पाच दिवसांवर गुढी पाडवा आल्याने इतक्या कमी वेळेत चित्ररथ तयार करणे कठीण जाईल. आमच्या यात्रेत 60-65 संस्थांचा सहभाग असतो. 40 ते 45 वैविद्यपूर्ण रथ असतात. आता परवानगी मिळाली तरी हे रथ कसे तयार होणार, असा प्रश्‍न दुधे यांनी उपस्थित केला.

ठाण्यात मात्र यात्रांची तयारी

ठाण्यात मात्र 30 ते 35 चित्ररथांची तयारी जोरात सुरू असल्याचे समजते. यंदाच्या शोभायात्रेचे प्रमुख पाहुणे ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर असून, त्यांच्या बैठकीत शोभायात्रेची रूपरेशा ठरणार असल्याचे सांगण्यात आले. स्वागतयात्रेची यजमान असलेल्या श्री कौपिनेश्‍वर सांस्कृतिक न्यासाने स्वागतयात्रेची जय्यत तयारी केली आहे.

मनसेच्या मेळाव्याचे काय?

शिवाजी पार्कवर गुढी पाडव्याला मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर मुंबईत जमावबंदी लागू झाल्यामुळे स्वागतयात्रांप्रमाणेच या मेळाव्यालाही जमावबंदी लागू होणार का? हा प्रश्‍न कायम आहे.

SCROLL FOR NEXT