Latest

मुंबई शहराला जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहराला जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा तलावांमध्ये आहे. विशेष म्हणजे शहराला दररोज सर्वाधिक 1 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणार्‍या भातसा तलावामध्ये आजही 39.47 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना उन्हाळ्यात भासणार्‍या पाणीटंचाईच्या संकटापासून दिलासा मिळणार आहे.

मुंबई शहराला ठाणे जिल्ह्यातील तानसा, मोडकसागर, भातसा व मध्य वैतरणा, नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तर मुंबई उपनगरातील नॅशनल पार्कमध्ये असलेल्या तुळशी व विहार तलावातून दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. 4 एप्रिल पहाटे 6 वाजेपर्यंत सातही तलावांमध्ये 37.82 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. म्हणजेच तलावांमध्ये 5 लाख 47 हजार 424 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. 2021 मध्ये 4 एप्रिलपर्यंत 34.69 टक्के पाणीसाठा होता. म्हणजे 5 लाख 2 हजार 43 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 45 हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी तलावांमध्ये आहे. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणार्‍या भातसा तलावात 2 लाख 83 हजार 37 दशलक्ष लिटर इतके पाणी आहे. तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा तलावातही गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा आहे.

मुंबई शहराला दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असल्यामुळे सध्याचा पाणीसाठा जुलै अखेपर्यंत पुरेल इतका आहे. मध्य वैतरणा तलावात गेल्यावर्षी 22 टक्के पाणीसाठा होता. मात्र यावर्षी 38 टक्के इतका पाणीसाठा आहे.

मोडक सागर तलावातही गेल्या वर्षी अवघा 34 टक्के पाणीसाठा होता यावेळी 49 टक्के पाणी असल्याचे जलअभियंता विभागाकडून सांगण्यात आले. मागील

दोन वर्षाच्या तुलनेत यंदा पाणी जास्त असल्यामुळे पाणीकपात करावी लागणार नसल्याचे एका अधिकार्‍याने स्पष्ट केले. त्यामुळे यंदाचा उन्हाळा मुंबईकरांसाठी टेन्शनमुक्त जाणार आहे.

SCROLL FOR NEXT