Latest

मुंबई : लोकल ट्रेन १००% रुळांवर

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुक्‍तीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत 100 टक्के सुरू झालेल्या मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन देखील 28 ऑक्टोबरपासून 100 टक्के धावणार आहे. गुरुवारपासून दोन्ही मार्गांवरील उर्वरित 131 फेर्‍या चालविण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेने सोमवारी जाहीर केला. यात मध्य रेल्वेवरील पंधरा डबा लोकलच्या फेर्‍यांचाही समावेश आहे.

पश्चिम रेल्वेवर कोरोनाकाळापूर्वी दररोज 1,367 लोकल धावत होत्या. सध्या 1,304 लोकल ट्रेन धावत आहेत. तर मध्य रेल्वेवर पूर्वी 1,774 फेर्‍या व्हायच्या. सध्या मात्र 1,704 लोकल फेर्‍या होतात. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन 28 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेवर सर्व 1,774 आणि पश्चिम रेल्वेवर सर्व 1,367 लोकल फेर्‍या चालविण्यात येणार आहेत.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांबरोबरच दोन लसमात्रा घेतलेले सामान्य प्रवासी आणि 18 वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आल्याने गेल्या सोमवारी मध्य व पश्चिम रेल्वेवरील प्रवासीसंख्या 60 लाखांवर पोहोचली. परिणामी सकाळी आणि संध्याकाळी लोकलला पूर्वीप्रमाणे गर्दी होऊ लागली असताना मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर संपूर्ण लोकल फेर्‍या मात्र सुरू नाहीत.

दरम्यान मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच एक डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांची संख्या जास्त असल्याने त्यांना लोकल ट्रेन प्रवासाची मुभा देण्याची मागणी जोर धरत आहे.त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर एक डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT