मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : खासदार नवनीत राणा दाम्पत्य राहत असलेल्या खार येथील लाव्ही इमारतीतील रहिवासी अडचणीत आले आहेत. घरातील अनधिकृत बांधकामाबाबत इमारतीतील रहिवाशांना पालिका अधिनियम 1888 कलम 488 नुसार नोटिस बजावल्या आहेत.
खार येथील 14 व्या रस्त्यावरील मलाव्हीफ इमारतीत आठव्या मजल्यावर राणा दाम्पत्याचे घर आहे. या घरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेने काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्य यांच्या घराची पाहणी केली होती. त्यावर राणा दाम्पत्याने आपली बाजू मांडणारे उत्तर पालिकेला दिले. मात्र हे उत्तर समाधानकारक नसल्याचे पालिकेने 19 मे रोजी पुन्हा नोटीस पाठवली आहे. त्यानंतर राणा दाम्पत्याने बांधकामे नियमित करण्याची विनंती केली आहे.
आता पालिकेने लाव्ही इमारतीतील एक ते सात आणि नवव्या मजल्यावरील रहिवाशांना नोटिसा पाठवल्या आहेत. सोसायटीतील सार्वजनिक जागेतील आणि काही रहिवाशांनी घरातील अनधिकृत बांधकाम केले असून, पालिकेचे पथक लवकरच या घरांची पाहणी करणार असून ही बांधकामे मोजणार असल्याचे समजते.