मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात भाजप सरकार असताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विविध विद्यापीठांच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदांवर केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने या नियुक्त्या रद्द केल्यास राज्यपाल आणि सरकार यांच्यामधील संघर्ष आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर 12 सदस्य नियुक्तीसाठी राज्यपालांकडे ठराव पाठवला आहे. पण या ठरावाकडे राज्यपालांनी कानाडोळा केला आहे, तर राज्यपालांवर कुरघोडी म्हणून विधानसभेत झालेल्या गदारोळाचा फायदा घेत सरकारने भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन केले आहे. यावरून सरकार आणि राज्यपालांमध्ये सुप्त वाद सुरू असतानाच आता सरकारने राज्यपाल नियुक्त अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदांवरील नियुक्त्या रद्द केल्यास या संघर्षात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने राज्य विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक संमत केले. त्यावरुन भाजपच्या अनेक नेत्यांकडून टीका सुरू आहेत.
विद्यापीठ सुधारणा विधेयकामध्ये करण्यात आलेल्या सुधारणेमुळे प्र-कुलपतीपदी विद्यमान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजात सरकार आणि मंत्र्यांचा थेट हस्तक्षेप वाढेल असा आरोपही भाजपकडून करण्यात येत आहे.
भाजपाकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना युवक काँग्रेस उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेवर राज्यपालांनी भाजपाशी संबंधित काही संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्याचे उघड केले आहे. तसेच भाजपाने राज्यपालांच्या आडून अनेक विद्यापीठांचे कुलगुरु नियुक्त करत असताना निकषांकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
विद्यापीठांच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त भाजपा पदाधिकार्यांची संख्या
1. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – 10
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ -6
3. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर-8
4. छत्रपती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – 6
5. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात -9
6. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ -9
7. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ – 6
8. मुंबई विद्यापीठ – 8
9. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली – 10
10. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव – 7
11. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ – प्रत्येकी 1