Latest

मुंबई : मनसेची महाआरती स्थगित

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याच्या मागणीसाठी मनसेने अक्षयतृतियेला राज्यभर महाआरती करण्याचा इशारा दिला होता. मात्र, या दिवशी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद असल्याने महाआरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मंगळवारी महाआरतीबाबत ते पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण आनंदात जावा, यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद येथे जंगी सभा घेतली. या सभेतही त्यांनी भोंग्यांबाबतची आपली भूमिका पुन्हा एकदा मांडली. या सभेनंतर महाआरतीची तयारी सुरू करण्यात आली होती.

ही महाआरती स्थगित करताना राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, मंगळवारी ईद आहे. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतिया या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून, सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचे, हे मी व्टिटव्दारे मांडेन, असे या निवेदनात राज यांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवा

चिथाणीखोर वक्तव्य करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर कारवाई करा, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी सिटी चौक पोलीस स्थानकामध्ये रितसर तक्रार दाखल केल्याचे सांगितले. दरम्यान, विभागाकडून योग्य कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यभरात 'ईद' नंतर 4 मे पासून मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन करीत राज ठाकरे यांनी औरंगाबाद सभेतून चिथावणी दिल्याचा आरोप पाटील यांनी तक्रारीत केला आहे. पाटील म्हणाले की, राज ठाकरेंचे वक्तव्य समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे असून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारे आहे. काही अटी-शर्तीच्या अधीन राहून पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिली होती. या अटींचे उल्लंघन करीत धार्मिक सौहार्द बिघडवण्याचे काम ते करीत आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्याने ठाकरे यांच्यावर कडक कारवाई करावी, असे पाटील म्हणाले.

नवी मुंबईत 50 मनसे पदधिकार्‍यांना नोटीसा

नवी मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या बैठकीत भोंग्याबाबत दिलेल्या अल्टीमेटमनंतर नवी मुंबई पोलीसांनी नवी मुंबई मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे, महिला सेनेच्या अध्यक्ष आरती धुमाळ यांच्यासह उपशहरध्यक्ष,शहर सचिव, शाखाध्यक्ष विभाग अध्यक्ष अशा नवी मुंबईतील 50 हुन अधिक पदधिकार्‍यांना नोटीसा बजावल्या आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT