Latest

तुकाराम महाराजांच्या अमृतवाणीत पंचामृत अर्थसंकल्प

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आज तुकाराम बीज आहे. तुकाराम महाराजांनी वैकुंठगमन केले. त्या जगदगुरु तुकाराम महाराजांच्या 'पिकवावे धन । ज्याची आस करी जन ॥' या तत्वास अनुसरून राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत अर्थसंकल्प गुरुवारी विधानसभेत सादर केला. जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या संदेशाची पखरण करत फडणवीस यांनी अर्थसंकल्प वाचून दाखवला. त्यात लोकप्रिय घोषणांचा समावेश असल्याने सत्तारुढ पक्षाच्या सदस्यांनी बाके वाजवून सभागृह दणाणून सोडले.

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प 'पंचामृत' ध्येयावर आधारित आहे, असे त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केले. फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोबतच सभागृहात एन्ट्री झाली आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा दिल्या गेल्या. फडणवीस यांनी, महिला दिन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'प्रॉब्लेम ऑफ रूपीज' या पुस्तकाचे शताब्दी वर्ष असा संदर्भ देत लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर मी अर्थसंकल्प सादर करत असल्याचे नमूद केले. पूर्वीचे अर्थमंत्री अर्थसंकल्पाच्या पुस्तकाचे वाचन करत. पण यावेळी त्यांनी पुस्तकाचे वाचन न करता टॅब वर अर्थसंकल्प वाचून दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यासाठी भरीव मदत जाहीर केली. तेव्हा सभागृह सत्तारूढ सदस्यांनी दणाणून सोडले.

प्रत्येक समाज घटकाच्या योजना जाहीर होत होत्या तसे सत्तारुढ सदस्यांना स्फुरण चढत होते. विशेष म्हणजे यापूर्वी कोणताही अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडताना विरोधकांकडून शेरेबाजी होत असते. यावेळी विरोधक शांतपणे अर्थमंत्री फडणवीस यांचे भाषण ऐकत होते. लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची…या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख करत फडणवीस यांनी 'लेक लाडकी' योजना नव्या स्वरूपात मांडली. नाचू कीर्तनाचे रंगी..आम्ही सारे वारकरी.. असा उल्लेख करत फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी 20 कोटीची तरतूद जाहीर केली. कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना त्यांनी जाहीर केली. बोलतो मराठी, वाचतो मराठी..माय मराठीच्या सेवेसाठी..असे सांगत श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली तर विश्वकोष कार्यालय वाई, मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारत अशा मराठी भाषेसाठी विविध घोषणा केल्या. त्याला सभागृहाने दाद दिली.

दुरितांचे तिमिर जावो हा प्रासंगिक संदेश घेवून आम्ही अर्थ संकल्प केला आहे, तो कृतीत आणू, असे सांगत फडणवीस यांनी अर्थसंकल्पचा शेवट केला.

SCROLL FOR NEXT