Latest

मुंबई : उद्यापासून मध्यरात्रीही धावणार बेस्ट

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : रुग्णालय, हॉटेल आणि विविध ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काम करणारे कर्मचारी, पर्यटक यांच्यासाठी बेस्ट उपक्रमाने शहरातील काही प्रमुख मार्गांवर बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी 7 मार्चपासून मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत या बस चालविण्यात येणार आहेत. बेस्टच्या या योजनेमुळे रात्री प्रवास करणार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी देखील आहे. त्यामुळे देशासोबतच जगभरातून विविध कामांसाठी नागरिक येथे येतात. याशिवाय दररोज मुंबईत येणार्‍या पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे. मुंबईत उपनगरीय रेल्वेची लोकल सेवा मध्यरात्री 1 नंतर बंद होते. सीएसएमटीहून मध्यरात्री 12.31 वाजता कुर्ल्याकरिता तर चर्चगेट येथून रात्री 1 वाजता बोरिवलीकरिता शेवटची लोकल सुटते.

या लोकल गेल्या की उपनगरीय रेल्वेची वाहतूक पहाटे 4 पर्यंत बंद असते. त्यामुळे रुग्णालय, हॉटेल, विमानतळ अशा विविध ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी बेस्ट उपक्रमाने मध्यरात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत दर एक तासानंतर काही मार्गावर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बस रात्रीपासून सुरू होणार असल्याने 'हात दाखवा, बस थांबवा' ही योजनाही राबवण्यात येणार आहे. बेस्टच्या या योजनेमुळे रात्री प्रवास करणार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सोमवारपासून या मार्गावर बस सेवा

बसमार्ग क्रमांक 1 – इलेक्ट्रिक हाऊस ते माहीम बस स्थानक
बसमार्ग क्रमांक 66 मर्या. – इलेक्ट्रिक हाऊस ते राणी लक्ष्मीबाई चौक
बसमार्ग क्रमांक 202 – माहीम बस स्थानक ते पोयसर आगार
बसमार्ग क्रमांक 302 – राणी लक्ष्मीबाई चौक ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)
बसमार्ग क्रमांक 305 – बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक.
बसमार्ग क्रमांक 440 – माहीम बस स्थानक ते बोरिवली स्थानक पूर्व द्वारा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ.

SCROLL FOR NEXT