Latest

मुंबई : आता झोपाळू प्रवाशांचे स्टेशन चुकणार नाही

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनेकदा प्रवाशी गाढ झोपलेले असतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे स्टेशन चुकते आणि मग चैन पुलिंगच्या घटना घडतात. अशा चैन पुलिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलने (आरपीएफ) एक अभिनव पद्धत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना झोपेतून जागे करण्यासाठी आरपीएफ जवान वेक अप कॉल देणार आहेत. गेल्या वर्षभरात दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण, इगतपुरी, कसारा आणि कर्जत या स्थानकांवर चेन पुलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

लांब पल्याच्या गाड्यांनी प्रवास करताना रात्रीच्या वेळी प्रवासी झोपी जातात. प्रवाशांना जेव्हा जाग येते, तेव्हा त्यांना उतरण्याचे स्थानक सुटलेले असते. त्यामुळे गोंधळलेले प्रवासी पुढील स्थानकात उतरण्यासाठी चैन पुलिंग करतात. चैन पुलिंगमुळे गाडी जागीच थांबते,त्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक बिघडते. चैन पुलिंगच्या घटना कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफने झोपलेल्या प्रवाशांना जागे करण्यासाठी पुढील स्थानकाच्या नावाची मोठ्याने घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन आरपीएफ कर्मचारी असतात. प्रत्येक एक कर्मचारी त्यांच्या वेक अप कॉलसह चार डबे कव्हर करणार आहे.

झोपलेल्या प्रवाशांना जागे करण्यासाठी आरपीएफ जवान पुढचे स्टेशन कल्याण, आगला स्टेशन कल्याण, नेक्स्ट स्टेशन कल्याण अशी घोषणा करतील.

सोमवारपासून हावडा-सीएसएमटी मुंबई मेल व्हाया नागपूर, हैदराबाद- सीएसएमटी हुसेनसागर एक्सप्रेस, निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस, सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्सप्रेस आणि फिरोजपूर-मुंबई सीएसएमटी पंजाब मेल या गाड्यांमध्ये याची अंमलबजावणी केली आहे.

* गेल्या वर्षभरात दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण, इगतपुरी, कसारा आणि कर्जत या स्थानकांवर चैन पुलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.2021मध्ये या सात स्थानकांवर चैन पुलिंगच्या एकूण एक हजार 361 घटना घडल्या आहेत. 2020मध्ये चैन पुलिंगच्या 628 घटना घडल्या होत्या. कल्याण स्थानकात सर्वाधिक 437 घटना घडल्या.तर कसारा स्थानकात 209 घटनांची नोंद आहे.

चैन पुलिंग केल्यास दंड
* कोणत्याही वैध कारणाशिवाय प्रवाशांकडून अलार्म चैन पुलिंग (-उझ) करणे हा दंडनीय गुन्हा आहे. चैन पुलिंग केल्यास तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा एक रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

चैन पुलिंगची कारणे
* वेळेवर न उठणे
* काही वेळा जास्तीचे सामान उतरवणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT