Latest

मुंबई : अनेक जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने आज वीस प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली करण्यात आली असून राहूल रेखावार यांना त्या पदावर नेमण्यात आले आहे. देसाई यांची बदली वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसचिव पदावर करण्यात आली. तर, राहुल रेखावार हे अकोला येथे राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता यांना वित्त विभागाचे प्रधान सचिव म्हणून नेमण्यात आले असून विकास चंद्र रस्तोगी यांना गुप्ता यांच्या जागेवर नियुक्ती देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदावर इंद्रा मालो यांना नेमण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांची बदली औद्योगिक विकास महामंडळाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे.

अन्य नियुक्त्या अशा: कंसात सध्याचे पद

* रूबल प्रखर-अग्रवाल : आयुक्त, एकात्मिक बालविकास योजना (अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका)

* रूचेश जयवंशी : महिला व बालविकास आयुक्त , पुणे ( जिल्हाधिकारी, हिंगोली )

* संजय यादव : सहव्यवस्थापकीय संचालक, रस्ते विकास महामंडळ

* शैलेश नवल : उपसचिव, सामान्य प्रशासन, मंत्रालय. ( जिल्हाधिकारी, अमरावती )

* आर. एच. ठाकरे : अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नागपूर.

* जितेंद्र पापळकर: महापालिका आयुक्त, अकोला. ( जिल्हाधिकारी, अकोला )

* जी. एम. बोडके : जिल्हाधिकारी, हिंगोली. (सह व्यवस्थापकीय संचालक, महावितरण)

* रविंद्र बिनवाडे: अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका ( जिल्हाधिकारी, जालना )

* दिपककुमार मीना: अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका

* पवनीत कौर : जिल्हाधिकारी, अमरावती (आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पुणे)

* विजय राठोड : जिल्हाधिकारी, जालना

* निमा अरोरा: जिल्हाधिकारी, अकोला

* आंचल गोयल : जिल्हाधिकारी, परभणी,

* बी.एन.पाटील: जिल्हाधिकारी, रत्नागिरी

राहुल रेखावार यांचा परिचय

* कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून राहूल अशोक रेखावार यांची मंगळवारी नियुक्ती झाली.

* 2010 मध्ये त्यांनी युपीएससीची परीक्षा देवून 15 वा रँक मिळवला. ऑगस्ट 2012 ते ऑगस्ट 2013 या काळात सिंधुदूर्ग येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले. गडचिरोली येथील इटापल्ली येथे ऑगस्ट 2013 ते फेब्रुवारी 2014 मध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा झाली होती. मार्च 2014 ते फेब्रुवारी 2015 या काळात नागपूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, तर फेब्रुवारी 2015 ते जुलै 2015 या काळात हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहीले.

* जुलै 2015 ते एप्रिल 2018 मध्ये परभणी महापालिका आयुक्त, एप्रिल 2018 ते जुलै 2019 धुळे येथे जिल्हाधिकारी, जुलै 2019 ते फेब्रुवारी 2010 महावितरण औरंगाबाद येथे सहाय्यक संचालक नंतर फेब्रुवारी 2020 ते जानेवारी 2021 बीडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. काही महिन्यापासून ते अकोला येथे एम.एस.सीड कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालकपदावर होते.
इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्सची पदवी

* रेखावार हे मूळचे नांदेडचे आहेत. दहावी बोर्ड परीक्षेत 91 टक्के आणि 12वीत 96.33 टक्के गुणांसह राज्यात दहावा आणि नांदेड बोर्डात त्यांनी दुसरा क्रमांक मिळविला होता. प्रतिथयश बिट्स पिलानी या संस्थेतून इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या विषयातून अभियांत्रिकीची डिस्टींक्शनमधून पदवी त्यांनी मिळविली. यानंतर भाभा अणुसंशोधन केंद्रात दोन महिने परिविक्षाधिन कालावधीही पूर्ण केला. त्यांना बंगळुरु येथील आयआयटी (इंडियन इन्स्टीट्युट ऑफ सायन्स) मध्ये यंग इंजिनीअर फेलोशिप प्रोग्राम पूर्ण करता आला. मद्रास येथील आयआयटीमध्ये झालेल्या हार्डवेअर डिझाईन कॉन्टेस्टमध्ये त्यांना पहिले पारितोषिक मिळाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT