नवी दिल्ली : 'विडंबन' या प्रकाराचा आधुनिक अवतार म्हणजे मीम्स. सोशल मीडियात हल्ली अनेक घटनांवर आधाररित मीम्स बनवले आणि शेअर केले जात असतात. हे मजेशीर मीम्स पाहण्याचा आनंद अनेकजण लुटत असतात. गेल्या वर्षभरात भारतीयांकडून मीम्स पाहणं किंवा शेअर करणं यामध्ये 80 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. इतकेच नव्हे तर भारतीय व्यक्ती दिवसातील 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास केवळ मीम्स पाहण्यात घालवत असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
स्ट्रॅटेजी कन्सल्टिंग फर्म असलेल्या 'रेडसीर'ने याबाबतची पाहणी केली आहे. मीम्स हे शेअर करण्यासही सोपे असल्याने त्यांची लोकप्रियता वाढली आहे. लोक आपल्या मित्रांसोबत, सहकार्यांसोबत असे मीम्स शेअर करतात. जगभरातील लोकांसाठी कित्येक मीम्समधील कंटेंट हा 'रिलेटेबल' असल्याने जागतिक स्तरावरही ते प्रसिद्ध होतात. त्यामुळे एका वर्षात त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाहणीत सहभागी झालेल्या अनेक लोकांनी आपण तणावातून मुक्त होण्यासाठी विनोदी मीम्स पाहत असल्याचे सांगितले.
50 टक्के लोकांनी आपले मीम्स पाहण्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही सांगितले. मीम्स पाहणार्या किंवा शेअर करणार्या व्यक्तींपैकी 90 टक्के लोक हे स्वतःच मीम्स बनवतात असे या रिसर्चमध्ये समोर आले. यामुळेच मीम्स तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्या अॅप्सची किंवा वेबसाईटस्ची संख्या वाढत आहे.